मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
भाजपने चित्रा वाघ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.पक्षाचा आक्रमक चेहरा अशी ओळख असलेल्या चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आतापर्यंत उमा खापरे यांच्याकडे महिला मोर्चाची धुरा होती.खापरेंची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यानंतर त्यांच्याकडील भार हलका करण्यात आला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांच्या नावाची घोषणा करत नियुक्तीचे पत्र दिले त्यानंतर पक्षातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.चित्रा वाघ गेल्या काही काळापासून महिलांचे प्रश्न आक्रमकपणे मांडताना दिसतात.महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटनांवेळी वाघ हिरीरीने आवाज उठवताना दिसतात या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांना मोठी बक्षिसी दिली आहे.खरे तर विधानपरिषद निवडणुकीत चित्रा वाघ यांना तिकीट मिळेल अशी चर्चा होती मात्र त्यावेळी भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना पक्षाने संधी दिली.आता मात्र पक्षनेतृत्वाने खापरेंच्या जागी चित्रा वाघ यांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान चित्रा वाघ यांना मोठी जबाबदारी मिळाली असली तरी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पक्षाने पुन्हा एकदा डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात वाघ आक्रमक भूमिका घेत असल्याने त्यांनी संधी मिळाली असल्याची शक्यता आहे.मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. पंकजांनी आपली नाराजी कधी उघड तर कधी सांकेतिक पद्धतीने व्यक्त केली होती.मात्र आताही डावलण्यात आल्याने त्यांच्या नाराजीमध्ये भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे राजकीय विश्लेषकांमध्ये बोलले जात आहे.