जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे.जाहीर सभांमध्ये युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना प्रक्षोभक भाषण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.ते जळगाव शहरात असताना सायंकाळी त्यांना पोलिस ताब्यात घेण्यासाठी गेले असता शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.पोलिसांनी त्यांना सोडले अन परत वरिष्ठांचे फोन खणखणल्याने त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस गेले.उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात सुरू आहे.यानिमित्त धरणगाव,पाचोरा आणि एरंडोल येथे सभा झाल्या यात सुषमा अंधारे यांच्यासोबत युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी अतिशय आक्रमक भाषण केले त्यांनी आपल्या भाषणात शिंदे गटाच्या आमदारांवर अतिशय शेलक्या भाषेत टीका केली.या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कारवाई करा या मागणीचे गुजर समाजबांधवांनी गुरुवारी (ता. ३) पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी शरद कोळी यांना भाषण करण्यास बंदी घातली आहे यामुळे शुक्रवारी (ता. ४) चोपडा,तर शनिवारी (ता. ५) मुक्ताईनगरातील शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेत ते भाषण करू शकणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस प्रशासनाने याबाबतची नोटीस शुक्रवारी कोळी यांना जारी केली.जळगावात ते वास्तव्यास असलेल्या रेल्वेस्थानक परिसरातील एका खासगी हॉटेलवरून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस दाखल झाले.मात्र अटकेला विरोध करत आम्ही स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर होतो असे म्हणत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत मोर्चा काढून पोलिस ठाणे गाठले.यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे,संजय सावंत,विष्णु भंगाळे,गजानन मालपुरे,कुलभूषण पाटील यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
शहर पोलिस ठाण्यात शिवसेना नेत्यांनी अटकेचे कारण आणि लेखी आदेशाची मागणी केल्यावर पोलिसांचा नाईलाज होऊन शरद कोळी यांना जाऊ देण्यात आले.पोलिस ठाण्यातून बाहेर निघाल्यावर शरद कोळी पुढे आणि पोलिस त्यांच्या मागावर धावत सुटले.शरद कोळी आणि पदाधिकारी चोपडा येथील सभेसाठी रात्री पावणेआठला रवाना झाले.”शरद कोळी यांनी दलित अत्याचारावर जाहीर भाषणातून टीका केल्याने त्यांना अटकेचा घाट प्रशासनाने घातला आहे.पोलिसांनी आधी भाषण करू नये असे सांगितले.आम्ही कायद्याचा आदर करून आम्ही मान्य केले मात्र नंतर पोलिसांनी कुठलेही ठोस कारण न देता त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला हा कोळी समुदायावर अन्याय आहे असे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.