जळगाव जिल्ह्यातील वैद्यकीय साहित्य खरेदीच्या अपहारप्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करावी
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे जळगाव येथील पत्रकार परिेषदेत आवाहन
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जळगाव जिल्ह्यातील कोविड काळातील वैद्यकीय साहित्य खरेदीच्या अपहाराप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे तसेच पाचोरा येथील सात ते आठ जमिनीचे प्लॉटचे आरक्षण काढण्यात झालेल्या तब्बल २०७ कोटींचा घोटाळा झाला आहे या दोन्ही प्रकरणांची चौकशी ‘ईडी’मार्फत करण्याबाबत भाजपच्या किरीट सोमय्यांनी शिफारस करावी असे थेट आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिले जळगाव येथे पत्रकार परिेषदेत त्या बोलत होत्या.श्रीमती अंधारे यांच्या नेतृत्वाखाली महाप्रबोधन यात्रा जिल्ह्यात सुरू आहे या संदर्भात जळगाव येथील हॉटेल के.पी.प्राईड येथे पत्रकार परिषद झाली.यावेळी शरद कोळी,जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत,पक्षाचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे,महानगरप्रमुख शरद तायडे,महापौर जयश्री महाजन,विरोधी पक्षनेते सुनील महाजन आदी उपस्थित होते.
श्रीमती अंधारे म्हणाल्या की महाप्रबोधन यात्रेस जनतेकडून जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे भाजप राज्यात जे कुटिल राजकारण करीत आहे त्याची माहिती जनतेला देण्यासाठीच ही महाप्रबोधन यात्रा होत आहे.हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप द्वेषमूलक राजकारण करीत आहे. ईडी,सीबीआय,निवडणूक आयोग यांचा वापर करून सूडाचे राजकारण करीत आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली आहे.किरीट सोमय्या विरोधी पक्षातील लोकांच्या चौकशीची मागणी करतात त्यांनी जळगाव जिल्हयातील कोरोनाकाळातील साहित्य खरेदीच्या व पाचोरा येथे सात ते आठ प्लॉटच्या जमीन व्यवहराच्या ‘ईडी’ चौकशीची मागणी करावी कारण त्यांचा ‘ईडी’शी अत्यंत जवळचा संबंध आहे.
संभाजी भिडे यांनी वृत्तवाहिनीच्या महिला प्रतिनिधीला ‘तू टिकली किंवा कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलेन’,असे वक्तव्य केले होते.त्याचा समाचार घेताना सुषमा अंधारे म्हणाल्या,की भारतीय संविधानाने प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगण्याचा हक्क दिला आहे.कुणी काय पेहाराव करावा,केशभूषा कशी करावी याचे ज्याचे त्याला स्वातंत्र्य आहे तरीही भिडे महिलांना उद्देशून असे वक्तव्य करीत असतील, तर त्यांचा वैयक्तिक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निषेध करीत आहोत.
शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गट सोडून गेलेले आमदार संजय शिरसाट शिंदे गटातून लवकरच परत येतील असा विश्वास श्रीमती सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.त्या म्हणाल्या की भुमरे,सत्तार व सावे यांना मंत्रिपदे मिळाली परंतु शिरसाट यांना काहीही मिळालेले नाही तसेच शिंदे गटाने नुकतेच पदाधिकारी जाहीर केले त्यातही त्यांना कोणतेही पद देण्यात आलेले नाही त्यामुळे आमदार शिरसाट प्रचंड नाराज आहेत ते बऱ्यापैकी आमच्या संपर्कात असून लवकरच ते परत येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.