जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेतून प्रदर्शित न करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ३५ दुकाने आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियम) अधिनियम, २०१७ नुसार सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षक तथा सुविधाकार यांनी ही फौजदारी कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील सर्व दुकाने, तसेच आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेतून असावेत असा निर्णय मंत्रिमंडळाने जानेवारी २०२२ मध्ये घेतला होता तसेच कामगार संख्या दहापेक्षा कमी असलेल्या सर्व आस्थापना किवा दुकानांसाठीही देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले होते.त्यासंबंधीचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते मात्र मागील अनेक महिन्यांपासून आस्थापना मालकांकडून याबाबत टाळाटाळ करण्यात येत होती या आस्थापनांवर जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उभारण्यास सुरवात करण्यात आली आहे त्यात आस्थापना मालकांना न्यायालयाने ३४ हजार दंड ठोठावला असून काही खटले प्रलंबित आहेत.
शासनाच्या मार्च २०२२ मधील अधिसूचनेनुसार जिल्ह्यामध्ये तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती त्यामध्ये ४०६ दुकाने आस्थापनांची तपासणी करण्यात आली त्यात मराठीतून नामफलक प्रदर्शित केले नसल्याचे आढळून आले होते त्यानुसार मराठीतून नामफलक प्रदर्शित करण्याचे सूचित करणे व नंतर नोटिसा बजावण्याची कार्यवाही आणि वर्तमानपत्रातूनही आवाहन करण्यात आले होते.तपासणी व नोटिसांतर्गत बहुतांश आस्थापनांकडून मराठीतून नामफलक प्रदर्शित केले असल्याचे आस्थापनांचे प्राप्त झालेल्या अहवालावरून दिसून आले आहे ज्यांनी अद्यापही नामफलक मराठीतून प्रदर्शित केले नाहीत अशा आस्थापनांवर कारवाई सुरूच राहील असे सहाय्यक कामगार आयुक्त सी.एन. बिरार यांनी कळविले आहे.