वाळूमाफियांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांची सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे त्यांचे जिल्ह्याभरात कौतुक
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांविरोधात उठविलेले रान सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. ४)ही सुरूच होते मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान जिल्हाधिकारी अमन मित्तल,तहसीलदार नामदेव पाटील यांनी खेडी,आव्हाणे परिसरात ही मोहीम राबविली या कारवाईत दोन डंपर जप्त करण्यात आले आहेत यामुळे वाळूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईचा धसका वाळूमाफियांनी घेतला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे त्यांचे जिल्ह्याभरात कौतुक केले जात आहे.
गेल्या बुधवारी पहाटे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी वाळू चोरणाऱ्या व त्यांच्या वाहनाभोवती संशयास्पद फिरणाऱ्या तब्बल सात जणांना ताब्यात घेतले होते त्यातील काही जणांचा जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क पाठलाग केला होता मात्र निमखेडीतील गल्ली बोळाचा फायदा घेत काहीजण पळून गेले होते मात्र सात जणांना पकडण्यात त्याच्या पथकाला यश आले होते त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदविली होती.
शुक्रवारी पहाटे आव्हाणे,खेडी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार,महसूल कर्मचाऱ्यांनी नदीपात्रातील मध्यरात्री बॅटरीच्या प्रकाशात संभाव्य वाळू चोरीच्या ठिकाणावर पाहणी केली.नदीपात्रात कोणी वाहने टाकून वाळू काढत आहे का?याची शहानिशा केली.यावेळी दोन डंपर पकडण्यात आले त्यातील एक डंपर (जीजे २१- ७४२४) व दुसरा विना क्रमांकाचा होता.वाहने पकडताच डंपरच्या वाहनचालकांनी पळ काढला दोन्ही वाहने तालुका पोलिस ठाण्यात जमा करून पंचनामा करण्यात आला सोबत वाहनमालकांवर गुन्हा नोंदविणे,विनाक्रमांकाच्या वाहनाच्या मालकाचा शोध घेण्याचे काम सुरू होते.आसोदा मंडलाधिकारी रमेश वंजारी,म्हसावद मंडलाधिकारी अजिंक्य आंधळे,चिंचोलीचे तलाठी सुधाकर पाटील, कानळदा तलाठी ज्ञानेश्वर माळी,ममुराबाद तलाठी विरेंद्र पालवे,वाहनचालक सचिन मोहिते,मनोज कोळी,सुरक्षारक्षक शिंदे,दीपक पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.