Just another WordPress site

ठाकरे गटाने विजयाची मुहूर्तमेढ रोवली;ऋतुजा लटके ६६ हजार २४७ मते मिळवून विजयी

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंच्या राजकीय लढाईत बाळासाहेबांनी प्राणापेक्षा प्रिय जपलेली धनुष्यबाण ही निवडणूक निशाणी निवडणूक आयोगाने गोठवली.ठाकरे गटाचे धनुष्यबाण चिन्ह गेले पण उद्धव ठाकरेंच्या सेनेला मुंबईत असलेली सहानुभूती,स्वत: अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार ऋतुजा लटके यांनी केलेला प्रचार आणि भाजप उमेदवार मुरजी पटेल यांची माघार यामुळे ऋतुजा लटके यांच्या माथी विजयाचा टिळा लागला आहे.ऋतुजा लटकेंनी एकूण ६६ हजार २४७ मते मिळवली आहे.नोटाला १२ हजार ७७८ मते मिळाली आणि १ हजार ५६९ मतांसह राजेश त्रिपाठी तिसऱ्या स्थानावर राहिले.ऋतुजा लटके यांच्या विजयाने ठाकरे गटाच्या शिवसेनेने शिंदेंच्या बंडानंतर मशाल चिन्हावर पहिला आमदार निवडून आणला आहे.मशाल चिन्हावरील हा विजय उद्धव ठाकरेंचा खूप महत्वाचा आणि बळ देणारा आहे कारण या विजयाने मुंबईतील जनता शिवसेनेच्या पाठिमागे खंबीरपणे उभा असल्याचा मेसेज उद्धव ठाकरे राज्यभरात देतील तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने देखील उद्धव ठाकरेंना या विजयाची मोठी मदत होणार आहे.एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे नेते गेले असतील पण कार्यकर्ते ठाकरेंच्या बाजूनेच आहेत असा मेसेजही राज्यभर जाऊ शकतो.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गेली तीन महिने ठाकरेंसाठी संकटाचा काळ होता.एकएक साथीदार साथ सोडून शिंदेंच्या टीममध्ये जात होते. ठाकरेंवर अगदी पक्ष आणि पक्षचिन्ह वाचविण्याची वेळ आली अशा परिस्थितीत रमेश लटके यांच्या निधनाने अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक जाहीर झाली.सुरुवातीलाच भाजपने ही जागा अतिशय प्रतिष्ठेची केली.अंधेरीत कळमच फुलणार असा विश्वास भाजप नेत्यांकडून होऊ लागला पण ठाकरेंना मिळत असलेली सहानुभूतीही मोठी होती दुसरीकडे याच काळात ठाकरेंच्या पाठीमागे भक्कमपणे पाय रोवून उभे राहिले ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष…अगदी हाडवैर असलेला कम्युनिस्ट पक्षाचाही उद्धव ठाकरेंना पाठिंबा मिळाला.काहीही झाले तरी लटके ताईंना विधानसभेत पाठवायचेच हा चंगच मविआ नेत्यांनी बांधला त्यात जनतेचाही उद्धव ठाकरेंना मोठा पाठिंबा मिळाला.भाजपने जर ही जागा लढवली तर पराभूत होण्याची शक्यता अधिक असल्याचे भाजपचे अंतर्गत सर्व्हेच सांगत होते अशी सूत्रांची माहिती होती या सगळ्यात भाजपने हुशारीने आपले उमेदवार मुरजी पटेल यांना अर्ज मागे घ्यायला लावला त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही मोठा वाटा राहिला कारण ही जागा बिनविरोध होऊ द्यात,लटके ताईंना विरोध करु नका अशी विनंतीच राज ठाकरे यांनी फडणवीसांना केली. झाले… पुढच्या काही तासांतच भाजपने उमेदवार मागे घेण्याची घोषणा केली व तिथेच शिवसेनेच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस आधी मतदारसंघात नोटाला मतदान करा असा प्रचार सुरु झाला होता.या प्रचाराचे परिणाम आजच्या निकालात पाहायला मिळत आहेत कारण आतापर्यंत आकडेवारीनुसार नोटाला दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधित मते मिळाली. ठाकरे गटाने अंधेरीत नोटाचा पद्धतशीरपणे प्रचार सुरु असल्याचा आरोप केला होता यामागे भाजपची फूस असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे होते.आज नोटाला पडलेली मते पाहता हा प्रचार काहीप्रमाणात यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एकतर मतदारांपुढे ऋतुजा लटके यांच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही तुल्यबळ उमेदवाराचा पर्याय नव्हता त्यामुळे मतदारांनी नोटाला मतदान केल्याची शक्यता आहे पण अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वी सोशल मीडियावर नोटाला ऋतुजा लटके यांच्यापेक्षा जास्त म्हणजे साधारण ४३ हजार मते मिळतील असा दावा करणारा एक सर्व्हे व्हायरल झाला होता परंतु आजचा निकाल पाहता हा दावा सपशेल फोल ठरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.