मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
ठाकरे आणि आंबेडकर ही एक ताकद आहे.ही ताकद जर एकत्र आली तर राज्याचेच नव्हे तर देशाचे राजकारण बदललेले दिसेल अशी प्रतिक्रिया आंबेडकर-ठाकरेंच्या मनोमिलनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर आधारित कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येणार आहेत याचविषयी राऊतांना विचारले असता त्यांनी इतिहासाला उजाळा देत बाबासाहेब-प्रबोधनकार ठाकरे यांच्या नात्याविषयी आठवणी जागवल्या.पत्रकार, समाजसुधारक आणि फर्डे वक्ते केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या २० नोव्हेंबरला मुंबईतील शिवाजी मंदिरमध्ये ‘प्रबोधन डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे लोकार्पण होणार आहे.या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येणार आहेत दोन्ही मान्यवरांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.गेल्या काही दिवसांपासून वंचित-शिवसेना युतीच्या चर्चांनी जोर धरलाय.वंचितने तर शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिल्याचीही चर्चा आहे अशा वेळी दोघे नेते एका व्यासपीठावर येत असल्याने संभाव्य युतीवर काही बोलणार का?याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.तत्पूर्वी राऊतांनी आंबेडकर-ठाकरे यांच्यातील नात्याला उजाळा दिला.
संजय राऊत म्हणाले कि महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हातात हात घालून काम केले आहे.बाबासाहेबांना महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी प्रचंड प्रेम होते त्यांची महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी रोखठोक-प्रखर मते होती जी इतिहासात नोंदली गेली.प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेबांना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी होण्याची जेव्हा विनंती केली तेव्हा बाबासाहेबांनीही प्रबोधनकारांच्या विनंतीला मान दिला त्यामुळे हे आजोबांचे नाते आता नातवांपर्यंत येऊन पोहोचले आहे.ठाकरे आणि आंबेडकर ही एक ताकद आहे ही ताकद जर एकत्र आली तर राज्याचेच नव्हे तर देशाचे राजकारण बदललेले दिसेल.प्रकाश आंबेडकर यांच्यावर महाराष्ट्राचे मनोमन प्रेम आहे.मी त्यांचा सदैव आदर करतो.त्यांचे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्राचे त्यांच्यावर फार प्रेम आहे असे संजय राऊत म्हणाले.