जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जळगावच्या सभेत सहा महिन्यांपूर्वी घोषणा करूनही बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाचा भाग्योदय झालेला नाही.मध्य प्रदेश,महाराष्ट्र व गुजरातला कनेक्ट करणाऱ्या या महत्त्वपूर्ण मार्गाच्या चौपदरीकरणाची साधी प्रक्रिया तर सोडाच पण हा रस्ता अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरितही झालेला नाही.मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर ते गुजरातमधील अंकलेश्वरपर्यंत जाणारा राज्य महामार्ग हा महाराष्ट्रातील जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून मार्गस्थ होतो. मध्य प्रदेशला महाराष्ट्रमार्गे गुजरातशी जोडणारा हा महामार्ग या तिन्ही राज्यांमधील सातपुड्याच्या पायथ्याला लागून प्रवास करता येतो. सातपुड्याला स्पर्श करणाऱ्या महत्त्वाच्या तालुके व गावांमधून हा मार्ग जातो.ज्या-ज्या भागांतून महामार्ग जातो तो भाग कृषिदृष्ट्या सधन, समृद्ध असला तरी व्यवसाय आणि उद्योगाच्या दृष्टीने तो मागास आहे.कृषिदृष्ट्या समृद्ध असलेल्या या क्षेत्रातील कृषिमालाला चांगली बाजारपेठ मिळवून देत व्यवसाय,उद्योगाच्या दृष्टीने भरभराटीसाठी चांगल्या दळणवळण व्यवस्थेची आवश्यकता आहे म्हणूनच या महामार्गाच्या चौपदरीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे त्याची गरज ओळखून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे.
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(आधीचा क्रमांक ६)च्या तरसोद-चिखली टप्प्यातील चौपदरीकरणासह अन्य प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी मंत्री गडकरी गेल्या एप्रिल महिन्यात जळगावला येऊन गेले.शहरातील शिवतीर्थावर या प्रकल्पांचे व्हर्चुअल लोकार्पण करण्यात आले त्याचवेळी गडकरी यांनी विविध नवीन योजनांची घोषणा करताना खासदार श्रीमती रक्षा खडसे यांच्या मागणीनुसार बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गाच्या चौपदरीकरणाचीही घोषणा केली होती.खरेतर गडकरी यांनी एखाद्या कामाबाबत शब्द दिला की दिला ते काम झालेच पाहिजे असे सांगितले जाते मात्र या रस्त्याची घोषणा करून आता सहा महिने झालेत मात्र या रस्त्याच्या चौपदरीकरणाशी संबंधित कुठलीही फाईल पुढे सरकलेली दिसत नाही.चौपदरीकरणाशी संबंधित प्रक्रिया तर दूरच पण चौपदरीकरणासाठी आवश्यक रस्ता हस्तांरणाचा प्राथमिक टप्पाही सुरू झालेला नाही.कोणत्याही महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर तो राज्य महामार्ग प्रथमत: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (न्हाई) वर्ग अथवा हस्तांतरित करणे गरजेचे असते.त्यादरम्यान त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्याची प्रक्रिया राबवायची असते असे असताना हा रस्ता अद्यापही ‘न्हाई’कडे वर्ग झालेला नाही.सूत्रांच्या माहितीनुसार रस्त्याच्या चौपदरीकरणासंबंधी डीपीआर बनविण्याची प्रक्रिया मात्र सुरू आहे मात्र गडकरींनी घोषणा करून सहा महिने झाल्यानंतरही या रस्त्यासंबंधी प्राथमिक प्रक्रिया सुरू झालेली नसल्याने आणखी किती वर्षे या रस्त्याचे काम सुरू व्हायला लागतील हा प्रश्नच आहे.
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे प्रस्ताव आल्यास त्याच दिवशी महामार्ग ‘न्हाई’कडे वर्ग करण्यात येईल त्यासंबंधी कागदपत्रे तयार आहेत असे प्रशांत येळाई,कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सांगितले आहे.तर हा महामार्ग अद्याप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झालेला नाही त्यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाला याआधीही पत्र दिले आहे आता येत्या १५ दिवसांत पाठपुरावा करून तो वर्ग करून घेऊ.महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी डीपीआर बनविला जात आहे असे सी. एम.सिन्हा,प्रकल्प संचालक,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी म्हटले आहे.