जळगाव-पोलीस(प्रतिनिधी):-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव शहरातील रस्त्यांची पाहणी करत नादुरूस्त तसेच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले होते.या आरोपांना मंत्री गिरीश महाजन यांनीही जोरदार उत्तर दिले आहे.एकनाथ खडसे हे सध्या रिकामे आहेत ते कुठेही फिरत राहतात मात्र विरोध करणे हे विरोधक म्हणून त्यांचे काम आहे.मी काय केले यापेक्षा त्यांनी काय काय केले? त्यांनी जे केले ते कारनामे लवकरच समोर येतील?असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना इशारा दिला आहे.गिरीश महाजन हे शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यादरम्यान अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे एकमेकांचे राजकीय वैरी आहेत हे संपूर्ण राज्याला माहित आहेत मात्र जिल्हा दूध संघांची निवडणूक तसेच जळगाव शहरातील रस्ते आणि विकास यावरून महाजन व खडसे यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटला आहे.एकनाथ खडसेंनी शुक्रवारी जळगाव शहराच्या रस्त्यांवरून केलेल्या आरोपांवर मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत ५० वर्षांचे नियम सत्तेचा दुरूपयोग करीत १५ मिनिटांत बदलण्यात आले असा आरोप खडसेंनी नाव न घेता मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केला होता.गेले पाच वर्ष जिल्हा दूध संघावर तुमची सत्ता होती या काळात तुम्ही काय काय केले ते लवकरच जनतेसमोर येईल.जिल्हा दूध संघप्रकरणी पोलिसात दोन गुन्हे दाखल आहेत.कोणाला उमेदवारी दिली हे काय सांगता.तुम्ही लढा…तुम्ही सांगाल..त्या माणसाला उमेदवारी देवू,असेही महाजन म्हणाले.तुम्हाला लोकांना अडकविण्यामध्ये,खोटे गुन्हे दाखल करण्यामध्ये स्वारस्य आनंद आहे मलाही अडकविण्याचा प्रयत्न झाला.मला मोक्का लावण्यात तुम्ही यशस्वी झाला.कायद्याचा एवढा खोटा आधार तुम्ही घेतला की तो उत्तर प्रदेश बिहारमध्येही होणार नाही.आम्ही एकही खोटा गुन्हा दाखल करणार नाही मात्र तुमचे जे सत्य आहे ते लोकांसमोर येईल असे म्हणत गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना इशारा दिला आहे.