अमरावती-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
जिल्ह्यातील भातकुली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांना २० हजाराची लाज घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.शिलाई मशीन प्रशिक्षण आणि गारमेंटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांनी पन्नास हजाराची लाच मागितली होती यातील वीस हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाने मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांना रंगेहाथ पकडले आहे.यातील तक्रारदार यांनी दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी लेखी तक्रार दिली.नगरपंचायत भातकुली येथील मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांनी तक्रारदार यांना भातकुली येथील दुकानांमध्ये शिलाई मशीन प्रशिक्षण व गारमेंटचा व्यवसाय सुरू करण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्या साठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत लेखी तक्रार प्राप्त झाली.तक्रारीवरून दिनांक २ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांनी तक्रारदार यांना भातकुली येथील दुकानांमध्ये शिलाई मशीन प्रशिक्षण व गारमेंटच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता ५० हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान यातील आलोसे यांनी तक्रारदार यांना त्यांचे घरी पैसे घेऊन येण्यास सांगितले.शुक्रवारी लावलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे करिष्मा वैद्य यांनी २० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारल्याने आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले नमूद आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन खोलापूरी गेट अमरावती शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधिक्षक मारुती जगताप,अरुण सावंत,देविदास घेवारे,संजय महाजन,प्रविण पाटील,पोलीस निरीक्षक,केतन मांजरे पोलिस निरीक्षक,राहुल वंजारी,विनोद कुंजाम ,युवराज राठोड आणि साबळे यांनी केली आहे.