नाशिक-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
नाशकात शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये सारे काही आलबेल नसून नाराजी असल्याच्या चर्चा सुरु आहेत अशातच आता शिंदे गटाला ठाकरे गटाने धक्का दिला आहे.शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या जिल्हा संघटक मंगला भास्कर यांनी ठाकरे गटात पुनर्प्रवेश केला आहे अवघ्या पंधरा दिवसातच त्यांची ठाकरे गटात घरवापसी झाली आहे.उद्धव ठाकरे गटातून अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. नाशिकमध्येही महिला पदाधिकारी मंगला भास्कर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा झेंडा हाती धरला होता मात्र आता अवघ्या दोन आठवड्यातच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री दादा भुसे,खासदार हेमंत गोडसे,आमदार सुहास कांदे आणि माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्यासह जिल्ह्यातील एक-दोन माजी आमदार,नेते शिंदे गटात गेलेत मात्र नाशिकमध्ये शिंदे गटात पाहिजे तशी संघटनात्मक पातळी मजबूत नसल्याचा दावा केला जातो.अशातच कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची संख्या कमी असतानाच पदाधिकाऱ्याने पुन्हा ठाकरे गटाची वाट धरल्याने आता नाशिक जिल्ह्यातील शिंदे गटाच्या पुढील संघटनात्मक पातळी आणि राजकीय वाटचालीबाबत राजकीय वर्तुळात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.मागच्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जिल्हा संघटक मंगला भास्कर या पालकमंत्री दादा भुसे,खासदार हेमंत गोडसे आणि आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटात गेल्या होत्या त्यांच्याकडे शिंदे गटाची मोठी जबाबदारी देखील देण्यात आली होती. मंगला भास्कर यांना जिल्हाध्यक्षपदही देण्यात आले होते मात्र ठाकरे गटाच्या नाशिकमधील काही नेत्यांनी शिंदे गटाला हादरा देत मंगला भास्कर यांना ठाकरे गटात सामील करून घेतले आहे.स्थानिक पातळीवरील संघटना मजबूत करण्यासाठी शिंदे गटात गेलेल्या नेत्यांकडून ताकद लावूनही पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजूनही ठाकरेंसोबत एकनिष्ठ असल्याचे चित्र नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे.अश्यातच आता मंगला भास्कर या शिंदे गटातून पुन्हा ठाकरे गटात आल्याने शिंदे गटात पदाधिकारी नाराज असल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे.