Just another WordPress site

जुन्या सरकारच्या काळातील गेलेले प्रकल्प आमच्या नावावर खपवू नये-मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भूमिका

नागपूर-नायक(वृत्तसेवा):-

जादूची कांडी फिरविल्याप्रमाणे कुठलाही प्रकल्प तीन-चार महिन्यांत येतो आणि जातो असे होत नाही.राज्यात सध्या विकासाभिमुख,उद्योगांचे स्वागत करणारे व चालना देणारे सरकार असल्याने तीन-चार महिन्यांत काय केले हे दिसेल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातून ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प गेल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.उद्योगमंत्री पण सोबत आहेत.कुठलाही प्रकल्प असा तीन-चार महिन्यांत आला व गेला असे कधी घडलेले आहे काय? आरोप करायचे तर कुणीही करू शकतो अडीच वर्षांत काय झाले हे राज्याला दिसले आहे.राज्याला मोठे उद्योग देऊ,मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल असे पंतप्रधानांनी आश्वस्त केले आहे.राज्यातील २२५ विकासकामांसाठी पंतप्रधान,गृहमंत्र्यांनी दोन लाख कोटी मंजूर केले आहेत त्यामुळे आम्ही काय केले हे दिसेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.शिवसेना-भाजप युतीचे सरकार विकासकामांना प्राधान्य देते.अडीच वर्षांतील कामे प्रलंबित होती त्यांना चालना देणे,विकास प्रकल्पांना वॉर रुममध्ये घेतले.त्यांच्यावर लक्ष ठेवणे,थांबलेले प्रकल्प पुढे नेणे सुरू आहे.काम नसलेल्या पक्षांबद्दल मला काही बोलायचे नाही असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनावरून नाव न घेता लगावला.जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली असेल यात कुणीही राजकीय हस्तक्षेप केलेला नाही व करणारही नाही असा दावाही त्यांनी केला.

अनुभवी वरिष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल झाले त्यांचे मार्गदर्शन व कामाचा आम्हाला निश्चित फायदा होईल असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.विमानतळावर खासदार कृपाल तुमाने,मंगेश काशीकर,संदीप इटकेलवार,सूरज गोजे, ओंकार पारवे आदींनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डीपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी परत एकदा जाहीर केले.राज्यातील उद्योगांच्या सर्व काळ-वेळा बघितल्यास सगळा घोळ महाविकास आघाडीच्या काळातील आहे.आमच्या काळातील नाही त्यामुळे जुन्या सरकारच्या काळातील गेलेले प्रकल्प आमच्या नावावर खपवू नये अशी रोखठोक भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केली.केंद्राने तीन पार्क जाहीर केले आहेत त्यातील एक मंजूर केला दोन प्रकल्प अद्याप दिलेले नाही.केंद्र सरकार वेगवेगळ्या राज्यात योजना करीत असते.सर्व राज्यांकडून प्रस्ताव मागविते.एक वा दोन राज्यात प्रस्ताव मान्य केले जातात.प्रत्येकवेळी महाराष्ट्रातून प्रकल्प गेले अशी ओरड करणे अतिशय चुकीचे आहे.यातून राज्याची बदनामी होते.प्रकल्प न आल्यास महाराष्ट्रातून प्रकल्प पळवला गेला अशा प्रकारचा कांगावा केला जातो त्यामुळे जुन्या सरकारच्या काळातील गेलेले प्रकल्प आमच्या नावावर खपवू नये असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.