नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पृथ्वीबाबांसोबतच मराठमोळे खासदार मुकुल वासनिक यांनाही गुजरात विधानसभा निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली आहे.मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच दोन मराठमोळ्या शिलेदारांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.पृथ्वीराज चव्हाण यांना मोठ्या कालावधीनंतर राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी मिळाली आहे.गुजरात निवडणुकीसाठी विभागनिहाय निरीक्षकांची निवड करण्यात आली आहे.मुकुल वासनिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पाच जणांची विभागनिहाय निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.पृथ्वीराज चव्हाणांकडे बडोद्याची जबाबदारी देण्यात आली आहे.महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार गेल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आली नव्हती.नुकतीच भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर ते राहुल गांधी यांच्यासह चालताना दिसले मात्र काँग्रेसश्रेष्ठींना पत्र लिहून उघड नाराजी व्यक्त जी-२३ मधील नेत्यांना काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात आणले जात असल्याचे चित्र आहे.
दरम्यान पर्यवेक्षकांमध्ये मुकुल वासनिक,पृथ्वीराज चव्हाण,मोहन प्रकाश,बीके हरिप्रसाद,केएच मुनियप्पा यांचा समावेश आहे.त्यांना विभागीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे याशिवाय प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरातमधील प्रत्येक जागेवर निरीक्षकांची नजर राहणार आहे.पक्षाने जारी केलेल्या निवेदनानुसार मुकुल वासनिक यांची गुजरातच्या दक्षिण विभागासाठी,मोहन प्रकाश यांची सौराष्ट्र विभागासाठी,पृथ्वीराज चव्हाण यांची मध्य विभागासाठी,हरिप्रसाद यांची उत्तर विभागासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.राजस्थान सरकारच्या काही मंत्री आणि आमदारांसह ३२ नेत्यांना गुजरातच्या २६ लोकसभा मतदारसंघांसाठी निरीक्षक बनवण्यात आले आहे.