नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
“भारत जोडो”यात्रेच्या निमित्ताने शेगावात होणाऱ्या राहुल गांधी यांच्या जाहीर सभेला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी उपस्थित राहण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.विशेष म्हणजे काँग्रेसने शेगावच्या सभेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले आहे.काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन जर शरद पवार आणि उद्धव ठाकरे शेगावच्या सभेला हजर राहिले तर भारतीय जनता पक्षाला विरोध करणाऱ्या पक्षांची युनिटी यानिमित्ताने एकाच मंचावर पाहायला मिळेल.महाविकास आघाडी स्थापन होऊन जवळपास तीन वर्ष झालीत. अडीच वर्षांचे सरकार चालवल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाने ठाकरे सरकार पडले पण तरीही महाविकास आघाडीत एकजूट दिसून येत आहे हे विशेष.अजूनही तिन्ही पक्षांनी एकमेकांची साथ सोडलेली नाही अशावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख रणनितीकार शेगावच्या सभेला हजर राहिले तर भाजपसाठी तो खूप मोठा मेसेज असेल.
मराठवाड्यातील फाळेगाव येथून सुरू झालेली यात्रा साधारणतः सकाळी ७ वाजताच्या सुमारास मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरील कनेरगाव नाक्याच्या पुलावर पोहोचली.यात्रा कनेरगावच्या पुलावर येण्यापूर्वी पैनगंगेच्या नदीपात्रात पाच हजार फुगे सोडून तिरंग्याचा देखावा साकारण्यात आला होता.पूल ओलांडल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची राष्ट्रवंदना झाली त्यानंतर एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नागेश करिआप्पा,प्रदेश पदाधिकारी अकांक्षा ठाकूर यांच्यावतीने १०० जणांच्या ढोल-पथकाच्या गजरात लाल किल्ल्याच्या दरवाजाच्या प्रतिकृतीतून राहुल गांधींनी वाशीम जिल्ह्यात प्रवेश केला.बोराळा हिस्से येथे त्यांचा दुपारचा मुक्काम राहील.आदिवासी समाजबांधवांसोबत राहुल गांधी हे बिरसा मुंडा जयंती साजरी करतील यात सुमारे १५ हजारांवर आदिवासी आपल्या समस्या मांडणार आहेत सोबतच आदिवासी समाजातील चौघांचा सत्कारही होईल यावेळी मोघे यांच्यासह माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी उपस्थित राहणार असल्याची माहिती जितेंद्र मोघे यांनी दिली आहे.या कार्यक्रमानंतर वाशीम पोलिस स्टेशन चौकात ‘कॉर्नर मिटींग’ होईल तसेच रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात यात्रेचा त्यांचा मुक्काम राहील.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने आज मंगळवारी मराठवाड्यातून विदर्भात प्रवेश केला.या यात्रेच्या स्वागतासाठी वाशीम जिल्ह्याच्या सीमेवर कनेरगावजवळ लाल किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली होती.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांचे कटआउटही लावण्यात आले होते.प्रवेशावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी राष्ट्रवंदना ऐकविली गेली.वाशीम मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी यात्रा जांभरून परांडे येथून मालेगावकडे रवाना होणार आहे.दुपारी ना.ना.मुंदडा विद्यालयामध्ये मुक्काम राहील.भोजन व विश्रांती घेतल्यानंतर यात्रा मेडशीकडे रवाना होणार आहे.मेडशीच्या ‘कॉर्नर मिटींग’नंतर कारने पातूरला जाणार आहेत तेथे त्यांचा मुक्काम शहा बाबू उर्दू कॉलेजमध्ये असेल.१७ नोव्हेंबरला पातूर येथून यात्रा बाळापूरकडे रवाना होईल असे काँग्रेसचे अकोला (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी सांगितले आहे.