मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून विशेष अग्रलेख लिहिण्यात आला आहे.बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्वच अचाट आणि अफाट होते.बाळासाहेबांच्या जीवनात व आचरणात ढोंगाला अजिबात स्थान नव्हते त्यांनी ढोंगाचा नेहमीच तिरस्कार केला.आज बाळासाहेब असते तर या ढोंग्यांना शिवतीर्थावरच सोलून आणि पाहून काढले असते असे म्हणत सामनातून अप्रत्यक्षपणे शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन.संकटाचे पहाड कोसळले तरी त्या संकटांच्या छाताडावर पाय रोवून उभे राहणारे त्यांचे नेतृत्व.अनेक वाद,वादळे आणि वावटळी त्यांनी अंगावर घेतल्या व परतवून लावल्या.मनुष्याचे अंतरंग स्पष्टपणे व्यक्त होण्याची वेळ आणि त्याच्या खरया कसोटीचा प्रसंग म्हणजे संकट त्यावेळी तेजस्वी पुरुष हताश होऊन स्वस्थ बसत नाहीत. शिवसेनाप्रमुखांच्या बाबतीतही तेच घडले.ज्या महाराष्ट्राच्या मातीचे,‘मराठी’समाजाचे आपण घटक आहोत तो महाराष्ट्र,मराठी समाज विस्कळीत झाला आहे त्याला राजदरबारात पिंमत नाही त्याला सार्वजनिक मत नाही.त्याला रोज अपमान आणि अवहेलनेस सामोरे जावे लागत आहे.स्वाभिमान’आणि ‘तेज’ या शब्दाशी त्याचा काही संबंध उरलेला नाही त्याला रोज लाथाडले जात आहे हे बाळासाहेबांनी पाहिले.मनावर घेतले परिणामी मराठी माणूस व महाराष्ट्रावरील अन्यायाविरुद्ध लढायचे आणि त्यासाठी शिवसेनेच्या विचाराधी मशाल धडधडत ठेवायची हेच आपले ध्येय असे त्यांनी ठरवून टाकले.ते ध्येय साध्य करण्यासाठी आपण आमरण झटत राहावयाचे असा त्यांनी त्या वेळी निर्धार केला त्याच निर्धाराने ते लढत राहिले.शिवसेनेला लढत ठेवले व शेवटी लढता लढता एका महान योद्धयाप्रमाणे त्यांनी आपला देह ठेवला.
शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी बाणा व प्रखर हिंदुत्वाचा विचार शिवसेनाप्रमुख पुढे पुढेच येऊन गेले.महाराष्ट्र म्हणजे दिल्लीच्या पायरीवरचे एक पायपुसणेच झाले होते.मराठी माणसांचा रामा गडी करून ठेवला होता.मोगलांनी आणि इंग्रजांनी आमच्या देशाची लूट केली तशीच लूट मुंबईसह महाराष्ट्राची सुरू होती.त्यावेळी बाळासाहेबांच्या विचारांची वीज कडाडली व संपूर्ण महाराष्ट्र त्या विचाराने उजळून निघाला.तो प्रकाश,ते तेज आजही कायम आहे.बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न आजपर्यंत काय कमी झाले?मात्र त्या सगळ्यांना शिवसेना पुरून उरली.आता शिवसेनेचा सूर्य गिळण्याचा प्रयत्न सुरू झाला पण या सूर्याच्या प्रखर तेजाने दुश्मन जळून खाक होईल असे सामनातून म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाने ‘बदला’ घ्यायचा म्हणून सत्तेचा गैरवापर करून शिवसेना फोडली.‘शिवसेना’ हे नाव व ‘धनुष्यवाण’चिन्ह गोठवले.अर्थात हा बदला नसून ‘राष्ट्रद्रोह’ आहे.शिवसेना ही प्रखर राष्ट्राभिमानी,राष्ट्रीय बाण्यासाठी लढणारी संघटना आहे.या संघटनेचे सेनापती बाळासाहेब ठाकरे होते व आजही आहेत.बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्वच अचाट आणि अफाट होते.बाळासाहेबांना ज्याप्रमाणे कट्टर विरोधक भेटले त्याप्रमाणे त्यांच्यावर अफाट प्रेम करणारेही असंख्य होते.विरोधकही त्यांच्यावर प्रेमाचा आणि स्तुतीचा वर्षाव करीत असत.महाराष्ट्रात शिवसेनेचा फुटीर गट बेइमानी करूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जप करतोय हे ढोंग आहे.बाळासाहेबांच्या जीवनात व आचरणात ढोंगाला अजिबात स्थान नव्हते त्यांनी ढोंगाचा नेहमीच तिरस्कार केला.महाराष्ट्राच्या मातीत ढोंगाला स्थान नाही.ढोंगाला लाथ मारा असे बाळासाहेब जाहीरपणे सांगत.भाजपने ढोगाशी ‘निकाह’ लावून सरकार बनवले व त्या ढोंगालाच ते ‘शिवसेना’ मानत आहेत.आज बाळासाहेब असते तर या ढोंग्यांना शिवतीर्थावरच सोलून आणि पाहून काढले असते असे म्हणत शिवसेनेने विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.