शिंदे सरकारचा ठाकरेंना दणका ! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी नव्याने पाठविण्याचे संकेत
ठाकरे सरकार काळातील विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी रद्द
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-ठाकरे सरकारच्या काळातील विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशा आशयाच्या मागणीचे पत्र नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे पाठविले असल्याबाबतची माहिती समोर आली आहे.यामुळे आता ठाकरे सरकारच्या काळात पाठविलेल्या १२ आमदारांची नियुक्ती रद्द होणार असल्याने शिंदे सरकार आता नवीन १२ आमदारांची नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविणार आहे.विशेष बाब म्हणजे २०२० पासून ठाकरे सरकारने पाठविलेल्या १२ आमदार नियुक्त करावयाच्या यादीवर राज्यपालांनी अद्यापि मंजुरी दिलेली नाही.परिणामी शिंदे सरकारने नव्याने पाठविलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल काय निर्णय घेणार ? हि बाब मोठी रंजक ठरणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारच्या काळातील विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची जुनी यादी रद्द समजावी अशा आशयाच्या मागणीचे पत्र नुकतेच राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे पाठविले आहे.त्यामुळे आता नवीन १२ आमदारांची नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविला जाणार आहे.शिंदे व फडणवीस सरकारमध्ये इच्छुकांची यादी मोठी आहे.याबाबत १२ नावांची यादी तयार करण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून चर्चा सुरु आहे व लवकरच यावर तोडगा काढला जाईल असा विश्वास शिंदे फडणवीस सरकारच्या वतीने व्यक्त केला जात आहे.त्यामुळे या यादीत कोणाचा समावेश होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकारने १२ नोव्हेंबर २०२० रोजी १२ आमदारांची नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविला होता.या यादीमध्ये एकनाथराव खडसे,राजू शेट्टी,रजनी पाटील,सचिन सावंत,मुझफ्फर हुसेन,अनिरुद्ध वनकर,यशपाल भिंगे,आनंद शिंदे,उर्मिला मोतोंडकर,नितीन बानगुडे पाटील,चंद्रकांत रघुवंशी आणि विजय करंजकर यांचा समवेश करण्यात आला होता.परंतु आता शिंदे फडणवीस सरकारने नव्याने नियुक्तीबाबतचा प्रस्ताव पाठविल्यास ठाकरे सरकारने पाठविलेल्या नावांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.