पश्चिम बंगाल-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राजधानी दिल्लीमध्ये घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे देशभरामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.या प्रकरणाशी संबंधित रोज नवी माहिती समोर येत आहे असे असतानाच आता पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगना जिल्ह्यामधील बरुईपूरमधून एक धक्कादायक असाच एक प्रकार समोर आला आहे.येथे तीन आठवड्यांपूर्वी एका तरुणाने आपल्या वडिलांची गळा दाबून हत्या केली.यानंतर या तरुणाने आईच्या मदतीने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावली.या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.मृत व्यक्तीच्या मृतदेहाचा एक भाग सापडला असून इतर तुकड्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.पोलीस अधिक्षक पुष्पा यांनी या घटनेसंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली.हत्या करण्यात आलेली व्यक्ती ही भारतीय नौदलामधून निवृत्त झालेली आहे.नॉन-कमीशन अधिकारी पदावर ही व्यक्ती कार्यरत होती.२००० साली ही व्यक्ती नौदलामधून निवृत्त झाली होती.हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव उज्ज्वल चक्रवर्ती असे असून ते ५५ वर्षांचे होते.त्यांच्या मृतदहाचे वरील भागातील काही तुकडे प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरुन तलावामध्ये फेकण्यात आले होते असे पुष्पा यांनी सांगितले आहे.
पुष्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार,उज्ज्वल चक्रवर्तीच्या कुटुंबियांनी १५ नोव्हेंबर रोजी ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तपासामध्ये चक्रवर्ती यांना दारुचे व्यसन होते ते अनेकदा दारु पिऊन मुलाला मारहाण करायचे.१४ नोव्हेंबर रोजी त्यांचा घरातील लोकांबरोबर वाद झाला त्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांचा गळा दाबला.मुलाने रागात गळा आवळल्याने उज्ज्वल यांचा मृत्यू झाला.उज्ज्वल यांच्या हत्येसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलाने त्यांच्या शरीराचे तुकडे केले.यामध्ये उज्ज्वल यांच्या पत्नीनेही मुलाला मदत केली.मृतदेहाचे नेमके किती तुकडे करण्यात आले याची माहिती समोर आलेली नाही.मात्र मृतदेहाचा दुसरा तुकडा राहत्या घराजवळच आढळून आला आहे असे पोलीसांनी सांगितले आहे.पोलिसांनी आरोपींना अटक केली असून आता अधिक तपास सुरु आहे.