पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
भारताच्या संविधानाची प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे.त्यासाठी संविधान हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असायला हवे असे मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व्यक्त केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी),डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टडीज यांच्यातर्फे आयोजित ‘संविधान सन्मान दौड’च्या उद्घाटनावेळी पाटील बोलत होते.पाटील यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे,प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी हिरवा झेंडा दाखवून दौड सुरू झाली.जिल्हाधिकारी राजेश देशमुख,पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.नितीन करमळकर,विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीजचे प्रमुख व अधिष्ठाता डॉ. विजय खरे,अधिष्ठाता डॉ.पराग काळकर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) धम्मज्योती गजभये,अविनाश महातेकर,कर्नल विजय कुमार,कर्नल मुखर्जी आदी या वेळी उपस्थित होते. संविधान उद्देशिकेचे वाचन झाल्यावर बॉम्ब सॅपर्सच्या बँड पथकाने राष्ट्रगीताचे वादन केले.
लहान मुले ते ज्येष्ठ नागरिक,पॅराप्लेगिक सेंटरचे वीस जवान,लष्कराचे साठ जवान या दौडमध्ये सहभागी झाले होते.संविधनाने आपल्याला दिलेल्या ताकदीचे आकलन करून त्याचा उपयोग आपले जीवन अधिक चांगले करण्यासाठी करावा.आपली कर्तव्ये विसरता कामा नये असे मत डॉ.कारभारी काळे यांनी व्यक्त केले.अमिताभ गुप्ता म्हणाले आज आपण प्रत्येक गोष्टीसाठी संविधान अभ्यासत असतो ही संविधानाची ताकद आहे.या दौडमध्ये सहभागी झालेल्यांना आपले शारीरिक स्वास्थ सुदृढ ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.दरम्यान अनुक्रमे १० कि.मी,५ कि.मी.आणि ३ किलोमीटर धावण्याच्या या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली तर सहभागींना प्रमाणपत्र आणि पदक देण्यात आले.