मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारने सध्या अभय दिले असून शिवसेनेसह महाविकास आघाडीने मात्र त्यांच्याविरोधात आक्रमक होण्याचे ठरविले आहे.राज्यपालांना हटविण्याच्या मागणीसाठी बुधवारी किंवा गुरुवारी महाराष्ट्र बंद पुकारण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये विचारविनिमय सुरू असून त्याबाबतची घोषणा सोमवारी केली जाण्याची शक्यता आहे.छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील राजकीय वातावरण तापले असून महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.राज्यपाल कोश्यारी नुकतेच हरयाणाला गेले होते.या दौऱ्यात ते नवी दिल्लीला जाऊन केंद्रातील वरिष्ठांची भेट घेतील अशी चर्चा होती पण खासगी कार्यक्रम आटोपून नवी दिल्लीला न जाता राज्यपाल राज्यात परतले.महाविकास आघाडी नेत्यांनी राज्यपालांविरोधात काहूर उठविले असले तरी त्यांच्या मागणीवरून राज्यपालांना हटविले जाण्याची शक्यता सध्या नसल्याचे भाजपमधील उच्चपदस्थांनी सांगितले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना न हटविल्यास महाराष्ट्र बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.केंद्र सरकार राज्यपालांना हटविणार नसल्याने आता हे आंदोलन करण्याचा शिवसेनेचा आग्रह असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर त्याबाबत चर्चा सुरू आहे.राज्यपालांना हटविण्याबरोबरच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्याच्या व भूमिकेच्या निषेधार्थही हा बंद पुकारला जाणार आहे.केंद्र सरकार राज्यपालांवर कारवाई करीत नसल्याने महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेणार असल्याचे ठरविले असून उद्धव ठाकरे यांनी आंदोलन व महाराष्ट्र बंदचा इशारा दिला होता त्यामुळे यासंदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.राज्यपालांवर कारवाई होत नसल्याने छत्रपती संभाजीराजे नाराज असून राज्य सरकार त्यांच्या वक्तव्यांशी सहमत आहेत का?असा सवाल त्यांनी केला आहे तर राज्यपालांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला.राज्यपालांनी खुलासा केला आहे आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अतिशय आदर असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.