मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीसंदर्भात चर्चा सुरू होती.मुंबईतील एक कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर एका मंचावर आल्यानंतर ही युती होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती असे असताना आता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी मोठी माहिती दिली आहे.उद्धव ठाकरे गटातील नेते सुभाष देसाई यांच्याशी दोन बैठका झाल्या असून आम्ही उद्धव ठाकरे गटाशी युती करण्यास तयार आहोत असे रेखा ठाकूर यांनी सांगितले आहे.“उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होण्याचे संकेत आहेत आम्ही त्याबाबत सकारात्मक आहोत मात्र आम्हाला एका गोष्टीवर स्पष्टीकरण हवे आहे.सध्या शिवसेना महाविकास आघाडीचा भाग आहे.महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी शिवसेना हादेखील एक पक्ष आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीतील चौथा पक्ष असेल की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार याबाबत आम्हाला निश्चितता हवी आहे त्यानंतरच पुढचे बोलणे सुरू होईल असे रेखा ठाकूर यांनी सांगितले.
सध्या आमची चर्चा फक्त उद्धव ठाकरे गटाशी सुरू आहे मात्र महाविकास आघाडीचा आमच्याकडे प्रस्ताव आल्यास आम्ही त्यावर चर्चा करू.पूर्ण चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात येईल.आम्ही आगामी निवडणुकीत कोणासोबतही जाणार नाही अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे आम्हाला थोडी असिंग्धता आहे.काँग्रेस तसेच इतर पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतरच वंचित बहुजन आघाडीला भूमिका घेता येईल असेही रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.