Just another WordPress site

‘त्या उलाढाली’एक दिवस अंगलट येतील त्यावेळी सरकारला अमित शहादेखील वाचवू शकणार नाही-संजय राऊतांचा खोचक टोला

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर कठोर शब्दांत टीका करताना दिसत आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदारांसमवेत कामाख्या देवीचे घेतलेले दर्शन,छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची आक्षेपार्ह विधाने या मुद्द्यांवरून ठाकरे गट शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक झाला आहे.विशेष म्हणजे हे सरकार लवकरच पडणार असून मध्यावधी निवडणुका लागतील असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे असे असतानाच उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या ‘रोखठोक’ या सदरात मोठे विधान केले आहे.मंत्रालयात सध्या पैशांची उलाढाल सुरू आहे.मुख्यमंत्री शिंदे यांना आपल्या ४० आमदारांना जपण्याचेच काम आहेत.या सर्व उलाढाली एक दिवस अंगलट येणार असून सरकारला अमित शाहादेखील वाचवू शकणार नाहीत असे संजय राऊत म्हणाले आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा सरळ अपमान केला तरीही ते राज्यपालपदावर चिकटून आहेत.राज्यपालांचे काय करायचे?याबाबत सरकारने देवीला विचारणा केली काय?कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांवर दावाच सांगितला. बेळगाव-कारवार-निपाणीसह मराठी सीमा भाग राहिला बाजूला उलट आणखी दोन जिल्हे आमचेच असे बरळणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध जनता संतापली पण राज्यकर्ते थंड आहेत.महाराष्ट्रातून मोठे उद्योग बाजूच्या गुजरात राज्यात पळवून नेले जात आहेत. लाखोंचा रोजगार त्यामुळे बुडाला व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे त्यावर थातूरमातूर उत्तरे देऊन निघून जात आहेत.गुजरात किंवा कर्नाटकने महाराष्ट्राच्या बाबतीत जो अन्याय चालवला आहे त्यावर स्वाभिमानी भूमिका घेण्याची हिंमत आज एकाही मंत्र्यात दिसत नाही. सरकार इतके बुळचट का झाले आहे? असे सवाल संजय राऊत यांनी केले आहेत.

देवेंद्र फडणवीस हे सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर मनापासून समाधानी आहेत काय?या प्रश्नाचे उत्तर आज फडणवीस यांना मानणारेही नीट देणार नाहीत.हे सरकार फडणवीस यांच्यावर लादले आहे व भाजपाचे मंत्री मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना मानायला तयार नाहीत यापुढे भाजपाच्या मोठ्या गटाचे भांडण शिवसेनेशी राहणार नसून ते शिंदे व त्यांच्या गटाशी राहील व त्याच अंतर्विरोधातून सध्याची व्यवस्था कोलमडून पडेल.कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य केले व पाठोपाठ कन्नड रक्षण वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत घुसून हैदोस घातला.जत तालुक्यात त्यांचे झेंडे लावले व महाराष्ट्राचे सरकार हे सर्व बघत राहिले!!महाराष्ट्रात असे कधीच घडले नव्हते.येथे महाराष्ट्राचा स्वाभिमान व शौर्य पायदळी तुडवले जात आहे असे म्हणत राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.मुख्यमंत्री शिंदे हे मोठे निर्णय घेण्यास असमर्थ आहेत त्यांच्या गटाच्या चाळीस आमदारांना खूश ठेवण्यातच त्यांचा वेळ जात आहे व ते चाळीस आमदार स्वतःला सरकारचे बाप समजत आहेत.फडणवीस यांनाही ते मानायला तयार नाहीत कारण शिंदे यांना दिल्लीनेच खुर्चीवर बसवले व त्यासाठी त्यांच्याच पक्षाने फडणवीस यांचे पंख कापले पण त्यात महाराष्ट्राचे नेमके काय भले झाले?असा सवाल राऊत यांनी केला.

सीमा प्रश्न हा भावनिक व अस्मितेचा विषय आहे.30 तारखेस सर्वोच्च न्यायालयात या प्रश्नी सुनावणी होणार म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे दोन दिवस आधीच दिल्लीत ठाण मांडून बसले व तेथे बसून पत्रकारांशी संवाद साधत होते.या काळात आपले मुख्यमंत्री कोठे गायब होते? महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नात तर त्यांची खरी कसोटी लागणार आहे.दिल्लीच्या नाकर्तेपणाचे सर्व ओझे आता त्यांच्या खांद्यावर येईल कारण सीमा प्रश्नासाठी आम्ही चाळीस दिवस बेळगावच्या तुरुंगात होतो असा डांगोरा त्यांनीच पिटला आहे त्यामुळे ते आता काय करणार?असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांना बेळगावात पाठवून काय साध्य होणार?हे वेळकाढूपणाचे धोरण ठरेल.कर्नाटकात आज भाजपाचे मुख्यमंत्री आहेत व महाराष्ट्रात भाजपपुरस्कृत शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे सीमा प्रश्न सुटला तर आनंदच आहे पण त्यासाठी जी हिंमत व धमक लागते ती आपल्या मुख्यमंत्र्यांत दिसत नाही व भाजपाचे महाराष्ट्रातील लोक शिंदे यांची मजा पाहत आहेत.शिंदे यांना फार लोकप्रियता व यश लाभू द्यायचे नाही असे एकंदरीत धोरण आहे.चाळीस आमदारांना जपायचे एवढेच मुख्यमंत्र्यांचे काम आहे.मंत्रालयात पैशांच्या मोठ्या उलाढाली सुरू आहेत त्या उलाढाली एक दिवस अंगलट येतील व सरकारला अमित शहादेखील वाचवू शकणार नाहीत असे भाजपावालेच सांगतात.कामाख्या देवीचे नवसही अशा वेळी कामी येणार नाहीत हेच खरे असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.