मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
कर्नाटक आणि महाराष्ट्रात सीमाभागातील गावांवरुन सुरु असलेल्या वादावरुन शिवसेनेने भारतीय जनता पार्टीबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लक्ष्य केले आहे.भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याचा इशारा दिल्याच्या मुद्द्यावरुन आज सामनाच्या अग्रलेखातून शिंदे सरकार आणि भाजपावर कठोर शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे.एखादे सरकार रामभरोसे चालते असे नेहमीच बोलले जाते पण महाराष्ट्राचे मिंधे सरकार हे नवस-आवस,तंत्र-मंत्र यावर चालले आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला या गंडे-दोरे-ताईतवाल्या सरकारविरोधात रान उठवावे लागेल.बेळगाव महाराष्ट्रात येवो असा नवस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मंत्री-आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटीला का जात नाहीत?असा प्रश्न आम्ही विचारला तो त्यामुळेच.मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे खासमखास बिल्डर अजय आशर यांना महाराष्ट्रात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून खोके सरकारची दिशा स्पष्ट केली आहे.नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात म्हणे ‘मित्र’ म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली ती बहुधा या अजय आशर महाशयांसाठीच.महाराष्ट्रात एकापेक्षा एक वरचढ असे तज्ञ,आर्थिक क्षेत्रातील जाणकार,उद्योग क्षेत्रातील महारथी असताना मुख्यमंत्र्यांनी या पदावर नेमले ते खोके सरकारचे ‘टेकू’ असलेल्या अजय आशर यांना.अजय आशर यांच्या गुजरात संबंधानेच महाराष्ट्रातील फुटीर आमदारांना सुरतचा मार्ग दाखवला.सुरतला ‘हिसाब-किताब’ झाल्यावर मग गुवाहाटी.ही सर्व खोके व्यवस्था करणारे हे महाशय महाराष्ट्राच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होतात.हे जंतर-मंतर फक्त सध्याचे मुख्यमंत्रीच करू शकतात असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
कानडी सरकारची ही ‘घुसखोरी’ फक्त नेभळट,लाचार आणि गुजरातच्या ताटाखालचे मांजर बनलेले सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आल्यामुळेच सुरू आहे.खोके सरकारचे आमदार महिलांना गलिच्छ भाषेत शिव्या देतात.दुसरे आमदार शिवसेना नेत्यांना आई-बहिणीवरून कॅमेऱ्यासमोर शिव्या देतात अशा नव्या विकृतीचा उदय महाराष्ट्राच्या राजकारणात होत आहे तो एकत्रित मोडून काढावाच लागेल.शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहेत त्यावर ठोस भूमिका घेतली आहे असे कुठेच दिसत नाही.शिंदे-फडणवीस सरकार हे मर्जीतल्या चाळीसेक खोकेबाज आमदार व बिल्डर ‘मित्रां’साठी सुरू आहे.शिवरायांचा अपमान व जनता गेली उडत असे कोणास वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. हा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल.विरोधी पक्षाने आता नरसिंह होऊन खोके सरकारचा अंत करावा ती वेळ आलीच आहे!अरे ला कारे म्हणजे नक्की काय हे दाखविण्यासाठी हिंमतबाज मर्दाचे मनगट लागते ते लवकरच दिसेल असा इशारा शिवसेनेने दिला आहे.