Just another WordPress site

मालमत्तेच्या वादातून ७४ वर्षीय वयोवृद्ध महिलेची मुलाकडून हत्या !

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

विलेपार्ले येथे राहणाऱ्या विना गोवर्धनदास कपूर या ७४ वर्षांच्या महिलेची तिच्याच मुलाने हत्या करून तिचा मृतदेह माथेरानच्या दरीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी मुलासह त्याला मदत करणाऱ्या नोकराला अटक केली आहे.सचिन गोवर्धनदास कपूर (४३) आणि छोटू ऊर्फ लालूकुमार मंडल (२५) अशी या दोघांची नावे आहेत.मालमत्तेच्या वादातून सचिनने त्याच्या आईची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.विना कपूर ही महिला विलेपार्ले येथील जुहू, किशोरकुमार गार्डनजवळील गुलमोहर रोड क्रमांक पाचच्या गरीबदास (कल्पतरु) सोसायटीमध्ये राहत होत्या.त्यांचा मोठा मुलगा अमेरिकेत वास्तव्यास आहे तर लहान मुलगा सचिन हा त्यांच्यासोबत राहात होता.गेल्या काही दिवसांपासून विना आणि सचिन यांच्यात मालमत्तेवरून प्रचंड वाद सुरू होता.हा वाद सध्या न्यायालयात सुरू असून खटल्याची एक प्रत विना कपूर यांनी सोसायटीला दिली होती.सोसायटीचा सुरक्षा पर्यवेक्षक जावेद अब्दुल्ला मापारी यांनी विना कपूर या बेपत्ता असल्याची तक्रार जुहू पोलिसांत मंगळवारी केली होती.त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती.

या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी केलेल्या तपासणीत विनासह सचिनचे मोबाईल लोकेशन काढले असता विना यांचे लोकेशन त्यांच्या राहत्या घरी तर सचिनचे लोकेशन पनवेल येथे असल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे पोलिसांनी सोसायटीतील सीसीटिव्हीचे चित्रीकरण ताब्यात घेतले होते.त्यावेळी सचिन व त्याचा नोकर छोटू हे विलेपार्ले येथील माऊली इमारतीच्या सदनिका क्रमांक २०३ मध्ये लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले.चौकशीत सचिनने त्याच्या आईशी मालमत्तेचा वाद झाल्याचे सांगून रागाच्या भरात तिला हाताने बेदम मारहाण केल्याचे तसेच बेसबॉलच्या बॅटने हल्ला करून तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे.हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने छोटूची मदत घेतली होती.विना यांचा मृतदेह एका खोक्यात भरून तो माथेरानच्या दरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.या दोघांच्या चौकशीतून उघडकीस आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला.याच गुन्ह्यांत बुधवारी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.पुढील तपास जुहू पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.