Just another WordPress site

चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांचा “वाह रे पठ्ठ्या…”म्हणत हल्लाबोल

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.फुले,आंबेडकर आणि कर्मवीर हे अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहिले नाहीत.त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या अशा आशयाचे विधान चंद्रकांत पाटलांनी केले.चंद्रकांत पाटलांच्या या विधानानंतर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही चंद्रकांत पाटलांवर टीकास्र सोडले आहे.पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार म्हणाले,फुले-आंबेडकरांनी अनुदानासाठी सरकारवर अवलंबून न राहता, त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या असे विधान आपले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.वाह रे पठ्ठ्या…आपण रक्कम दिली तर त्याला देणगी दिली असे म्हणतो किंवा लोकवर्गणी दिली म्हणतो.त्या काळात भाऊराव पाटील यांनी ‘कमवा आणि शिका’ योजना सुरू केली होती. जुन्या लोकांना हे आठवत असेल.प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे हा भाऊराव पाटील यांचा विचार होता.

त्या काळात काही लोकांनी कर्मवीरांना शाळेसाठी जमिनी दिल्या तर काही लोकांनी खोल्या बांधून दिल्या होत्या.याचा अर्थ त्यांनी भीक मागितली का?डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागितली का?कुठले शब्द कसे वापरायचे?याचे भान राखले पाहिजे.अरे तुम्ही पुण्यासारख्या ‘विद्येचे माहेरघर’असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात असेही अजित पवार म्हणाले.उपस्थित नागरिकांना उद्देशून बोलताना अजित पवार पुढे म्हणाले,ही जी भाषा वापरली जातेय,ही बदलण्याची खरी ताकद तुमच्यात आहे.कुणाला निवडून द्यायचे आणि कुणाला घरी पाठवायचे आणि कुणाला शेती बघायला लावायची हे तुमच्या हातात आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून मतदानाच्या अधिकारा अंतर्गत हा अधिकार तुम्हाला दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.