सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करून निषेध करणार्या कार्यकर्त्याची सांगलीमध्ये २३ डिसेंबर रोजी हत्तीवरून मिरवणुक काढून जाहीर सत्कार करण्याचा निर्णय डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे यांनी मंगळवारी दिली आहे.महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाउराव पाटील यांच्या अतुलनीय शैक्षणिक कार्याबद्दल अपशब्द वापरणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे समता दलाच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक करून निषेध केला.
या घटनेमुळे मूलतत्ववादी विचारांना लोकशाही मार्गाने विरोध करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला असून शाई फेक करणारे मनोज गडबडे व या घटनेचे छायाचित्रण करणारे पत्रकार गोविंद वाकडे यांची सांगलीत २३ डिसेंबर रोजी हत्तीवरून मिरवणूक काढून जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही मिरवणुक सुरू होणार असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात येणार आहे.यानंतर जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.गडबडे व वाकडे याच्याबरोबरच विक्रम होवाळ,आकाश इजद यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार असल्याचे प्रा.कांबळे यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी नुकतीच सांगलीत बैठक पार पडली.या बैठकीस नंदकुमार भंडारे,संदीप ठोंबरे,वीरू फाळके,अशोक वायदंडे आदी उपस्थित होते.