राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह अन्य भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.त्यामुळे अधिवेशनातदेखील हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.दरम्यान या मुद्द्यावरून शिवसेनेने पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले आहे.“शिवरायांचा अपमान करणारे भाजपाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे फडणवीस-शिंदे सरकारचे श्रद्धास्थान आहे.हे अपमानकर्त्यांच्या इतक्या प्रेमात पडली आहे की, भगतसिंग कोश्यारींचा अश्वारूढ पुतळा उभारून हे लोक समृद्धी महामार्गाच्या प्रवेशद्वारावर उभारून त्यांच्या नावाने एखादे महाराष्ट्रगीत रचतात की काय असे आता जनतेला वाटू लागले आहे”अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे.महाराष्ट्रातून उद्योग पळवले जातात,कर्नाटकाचे मुख्यमंत्री सीमाप्रश्नी महाराष्ट्राला चपराक मारतात व त्यावर उतारा म्हणून फडणवीस-शिंदे दिल्लीत जाऊन गुंगीचे औषध घेऊन येतात.महाराष्ट्र अशा ‘गुंगारामां’च्या हाती सुरक्षित नाही व या गुंगारामांची झोप उडण्याची चिन्हे दिसत नाहीत मात्र ती उडवावीच लागेल.मुंबईतील महामोर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाआधी निघाला त्यामुळे त्याचे पडसाद नागपुरात आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटतील असेही शिवसेनेने म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या सरकारात आज सगळे काही आलबेल नाही.चाळीस विरुद्ध एकशे पाच असा अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे.या संघर्षामुळे राज्याचे प्रशासन हतबल आहे.राज्याच्या विकासाची सूत्रे मर्जीतल्या बिल्डरांच्या व लॅण्ड डीलर्सच्या हाती सोपवून मुख्यमंत्री वेगळ्याच पद्धतीने कलेक्टरी करीत आहेत.लुटींचा वाटा दिल्लीच्या चरणी अर्पण करून खुर्ची वाचवत आहेत.लुटीचा हिस्सा फुटीर व बेइमानांत वाटला जात आहे. शिवसेना फोडण्यासाठी याच लुटीचा हिस्सा वापरला गेला असा आरोपही शिवसेनेकडून करण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे एक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी दलित कार्यकर्त्यांनी शाईफेक केली.त्या कार्यकर्त्यांवर हत्येचा प्रयत्न करण्याची कलमे लावून सरकारने आपण घाबरलो आहोत हे सिद्धच केले.पुन्हा त्या दिवसापासून महाराष्ट्रातील सर्वच मंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था ‘डबल’ केली.स्वतः चंद्रकांत पाटील हे दुसऱ्या शाईफेकीच्या भयाने चेहऱ्यावर प्लॅस्टिकचा मोठा मास्क लावून फिरत आहेत.राज्याच्या मंत्र्यांवर भीतीच्या सावटाखाली फिरण्याची वेळ यावी हे कसले लक्षण समजायचे?असा प्रश्नही सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.