Just another WordPress site

शासनाकडून शिक्षकांना बदनाम करण्याचे षडयंत्र -आमदार कपिल पाटील यांचा आरोप

शिक्षक भारतीतर्फे आयोजित एकदिवशीय राज्यस्तरीय धरणे आंदोलन यशस्वी

नागपूर-पोलीस नायक(प्रतिनिधी):- 

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी सदैव लढणाऱ्या शिक्षक भारतीचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात शिक्षक भारती राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे,प्राथमिक शिक्षक भारती राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांचे नेतृत्वात २२ डिसेंबरला यशवंत स्टेडियम येथे राज्यस्तरीय एकदिवसीय धरणे आंदोलन शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांना घेऊन आयोजित केले होते. आंदोलनात सहभागी शिक्षकांना मार्गदर्शन करताना आमदार कपिल पाटील बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले,शिक्षक देशाचा शिल्पकार आहे.तरी शिक्षकांना बदनाम करण्याचे षडयंत्र शासनाचे सुरु आहे.पेन्शन,अनुदान या प्रश्नांवर सरकार नकारात्मक आहे.प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी राहण्याच्या प्रश्नावरुन नाहक त्रास दिल्या जात आहे.पेन्शनचा हक्क हिरावून घेणाऱ्या सरकारला धडा शिकवला पाहिजे.सर्वांनी आपापल्या छावण्या एक करणे गरजेचे असून अन्यायाविरुद्ध आपली वज्रमुठ बुलंद करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार कपिल पाटील यांनी विषद केले.

या धरणे आंदोलनात सर्व कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करावी,वस्तीशाळा शिक्षकांना मूळ दिनांकापासून वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यात यावी,सर्व पदवीधर/विषय शिक्षकांना ४३०० ग्रेड पे वेतनश्रेणी मिळावी,२००४ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांची सातव्या वेतन आयोगात निर्माण झालेली वेतनत्रुटी दूर व्हावी,शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांची मुख्यालय राहणे संदर्भातील अट शिथिल करण्यात यावी,वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण झालेल्या शिक्षकांना तात्काळ वेतनश्रेणी लागू करावी तसेच नव्याने पात्र झालेल्या शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुरू करावे, ऑनलाइन कामांसाठी तालुकास्तरावर/ केंद्र स्तरावर स्वतंत्र व्यवस्था विकसित करावी. मुख्याध्यापकांचा अशैक्षणिक कामाचा ताण कमी करावा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना १०-२०-३० आश्वासित प्रगती योजना त्वरीत लागु करावी, ७ व्या वेतन आयोगाचे थकित वेतन त्वरीत देण्यात यावे,वैद्यकिय बिले एरिअर्स बीले त्वरीत देण्यात यावे, शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांची मुख्यालय राहणे संदर्भातील अट शिथील करण्यात यावी,अनुदान सरसकट १०० टक्के देणे (२०,४०,६०,८०, १००) असे नाही, विनाअनुदानित कर्मचाऱ्यांना अनुदानित तुकडीवर घेता यावे,नो वर्क नो पे आश्रम शाळेबद्दलचा शासननिर्णय रद्द करावा,रात्रशाळेतील दुबार शाळेतील शिक्षकांना ३०जून २०२२ च्या शासन निर्णयानुसार पूर्वरत करावे ,NPS मध्ये जमा होणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पैशाच्या हिशोबाच्या पावत्या मिळाव्या,शिक्षण खात्यातील रिक्त पदे भरण्यात यावीत आदी मागण्या करण्यात आल्या.

धरणे आंदोलनात प्राथमिक शिक्षक भारती राज्याध्यक्ष नवनाथ गेंड,शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे,राज्य संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर,विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे,राज्य नेते प्रकाश दाणे, सरचिटणीस भरत शेलार,राज्य उपाध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर,किशोर वरभे, विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे आदींनी मार्गदर्शन केले.मारोती सयाम,उमेश शिंगनजुड़े,जळगाव जिल्हाध्यक्ष सोमनाथ ब्रिजलाल पाटील, राजेश भुसारी,प्रवीण फाळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.धरणे आंदोलनाचे सूत्रसंचालन नागपूर विभागीय कार्यवाह सपन नेहरोत्रा यांनी केले.दरम्यान आंदोलनातील विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले असे शिक्षक भारती प्राथमिकचे जळगाव जिल्हाध्यक्ष सोमनाथ ब्रिजलाल पाटील यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.