अट्रावल येथील मुंजोबा यात्रोत्सवाला उद्या दि.२३ पासून प्रारंभ
फैजपुर उपविभागीय पोलीस उपअधीक्षकांसह विविध अधिकाऱ्यांनी केली यात्रा स्थळाची पाहणी
यावल- पोलीस नायक(प्रतिनिधी):-
राज्यासह जिल्ह्यातील खानदेशवासीयांचे श्रध्दास्थान असलेले तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबा यात्रोत्सवाला उद्या दि.२३ सोमवार पासून प्रारंभ होत आहे.या यात्रेनिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रेची परिपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे.येथे यात्रा सुरु होण्याच्या आधीची पुर्वतयारी म्हणून यात्रा स्थळावर विविध व्यावसायिकांनी आपआपली दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे.५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या यात्रेनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या कारणासाठी फैजपुर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे,यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,यावल एस.टी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन,यावल आगार वाहतूक अधीक्षक जितेंद्र जंजाळ यांनी शुक्रवारी रात्री यात्रा स्थळाची पाहणी करत विश्वस्तांना विशेष सूचना केल्या आहेत.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्गाच्या गोंधळानंतर यंदा यावर्षी प्रथमच श्री मुंजोबा महाराज यांची यात्रा भरत असल्याने यात्रेत मोठी गर्दी होणार असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच मुंजोबा यात्रा देवस्थान समितीच्या वतीनेदेखील मुंजोबा दर्शनाची नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे.सदरील प्रसिद्ध मुंजोबाची नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे.या यात्रेत मध्यप्रदेशसह जिल्ह्यातील भाविकभक्त मोठ्या प्रमाणात येत असतात.माघ महिन्यातील सोमवार व शनिवार सह पोर्णिमेला ही यात्रा भरत असते.यावर्षी यात्रेचे पौर्णिमेसह म्हणजेच २३जानेवारी(सोमवार),२८जानेवारी (शनिवार),३०जानेवारी (सोमवार), ४फेब्रुवारी (शनिवार),५फेब्रुवारी (पोर्णिमा) असे पाच वार पडणार आहेत.या यात्रेनिमित्त मान देण्याची प्रथा प्रचलित असून गेल्या यात्रेत मुंजोबाला इच्छित मागणे मागितल्यानंतर त्याची कार्यसिद्धी होताच त्या कुटुंबाकडून मुंजोबा यात्रेत मान दिला जातो यात रोडगे,वरण,भात व वांग्याच्या भाजीचे जेवण दिले जाते.यात्रेत असे मान देणाऱ्या कुटुंबीयांची संख्या शेकडोने असल्याने यात्रा स्थळी ठिकठिकाणी जेवणावळीच्या पंक्ती दिसून येतात.यानिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने यावल,भुसावळ,फैजपूर,रावेर या बसस्थानकांमधून एसटी बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.यानिमित्त यावल पोलीस स्टेशनच्या वतीने यात्रास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.त्याचबरोबर देवस्थानच्या वतीनेदेखील स्वयंसेवक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.