जामनेर-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
भारतीय कृषी संस्कृतीचा अनिवार्य घटक असलेल्या तृणधान्याला जागतिक स्तरावर आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.तृणधान्यांचे आहारातील महत्त्व जाणून घेऊन त्यांचा वापर दैनंदिन आहारामध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे.या उद्देशाने संयुक्त राष्ट्राने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.त्यानिमित्ताने तालुक्यातील वाकी खुर्द येथे डॉ.उल्हास पाटील कृषी महाविदयालय जळगाव येथील कृषीदुतांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृण धान्य वर्ष नुकतेच साजरे करण्यात आले.
प्रसंगी डॉ.उल्हास पाटील कृषी महाविदयालय जळगाव येथील कृषीदुतांच्या वतीने वाकी खुर्द येथे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या संकल्पनेतुन गावात एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी आजच्या बदलत्या जीवनशैलीत पौष्टीक आहाराचे महत्व,तृणधान्य पिकात भात, ज्वारी,बाजरी,राजगिरा,वरई (भगर) या पिकांच्या समावेशाबाबत माहिती,तृणधान्य पिकांमध्ये रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर, तृणधान्यातील पौष्टिक मुल्य व त्यांच्या वापराने होणारे फायदे,तृणधान्य पिकाची करावयाची लागवड याबाबत कृषिदूतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना माहिती देण्यात आली.तसेच तृणधान्य पिक वातावरणातील ताण सहन करणारे तसेच कीड व रोगांना प्रतिकार करतात त्यामुळे शेतकरी वर्गाने तृणधान्य मोठ्या प्रमाणात पिकवावे तसेच नागरिकांनी तृणधान्याचा दैनंदिन आहारात समावेश करावा असे आवाहन कृषिदुतांच्या वतीने करण्यात आले.सदरील कार्यक्रमाला सरपंच सुधाकर सुरवाडे,उपसरपंच शिवाजी तेली,ग्रामसेवक राजू बोडखे, ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेकरिता कृषिदुत योगेश पाटील,ऋषिकेश पाटील,शिवराज पाटील,प्रणव पाटील,पियूष पाटील,निखिल पाटील व जयेश रोकडे यांनी परिश्रम घेतले.