गोंदिया-पोलीस नायक (वृत्तसेवा):-आतापर्यंत एखाद्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार करण्याकरिता नागरिकांना पोलीस स्टेशन मध्ये जावे लागत होते.परंतु आता गोंदिया पोलिसांनी “पोलीस आपल्या दारी”हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.या उपक्रमानुसार गंभीर गुन्ह्याची एफआरआय पीडिताच्या घरी किंवा ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या घटनेच्या ठिकाणीच पोलीस जाऊन करणार आहेत.या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे गंभीर गुन्ह्यातील नोंदीला होणारा उशीर टळणार आहे.वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे तसेच घडलेल्या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध योग्य व सबळ पुराव्यासह न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणे पोलिसांना अधिक सोयीचे होणार आहे.जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासोबतच त्यांना लोकाभिमुख सेवा देणे,पोलिसांच्या कामकाजात गतिमानता आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश्य आहे.अशी माहिती गोंदिया पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली आहे.
या उपक्रमानुसार गुन्ह्याच्या ठिकाणी गुन्ह्याची तक्रार नोंद हि पोलीस लॅपटॉपवर टाईप करतील व प्रिंटरद्वारे त्याची प्रिंट काढून ती तक्रारदारास वाचण्यास देतील किंवा तक्रारदारास वाचून दाखवतील व त्यांच्या भाषेत समजावून सांगतील.त्याचबरोबर ती तक्रार पोलीस स्टेशनला ई-मेल किंवा व्हाट्सअप द्वारे पाठवून त्याची पोलीस स्टेशनला एफआरआय गुन्हा नोंद करण्यात येणार आहे.जेष्ठ नागरिक,शारीरिक कारणाने आजारी असणारे,बलात्कार पीडित,पोस्कोच्या गुन्ह्यातील पीडित,तक्रारदार आजारी किंवा गंभीर असेल व रुग्णालयात उपचारासाठी दाखल असेल अशा तक्रारदारांना त्यांच्या एफआरआय (गुन्हा) नोंद करणे सोईचे होणार असून त्यासोबतच गुन्ह्याच्या नोंदीला लागणार विलंब टाळता येणार आहे.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांच्या सुविधेकरिता “पोलीस आपल्या दारी”हा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविला जात आहे.गोंदिया जिल्यातील १६ पोलीस ठाण्यात हि सुविधा सुरु करण्यात आली आहे.सन २०२१-२२ या कालावधीत जिल्हा नियोजन समितीच्या वतीने गोंदिया जिल्हा पोलीस दलाकरिता प्राप्त निधीतून ३७ लॅपटॉप व २१ प्रिंटर्स खरेदी केली असून ते जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला पुरविण्यात आले आहे.सदरील उपक्रमाची प्रायोगिक तत्वावर २९ ऑगस्ट २२ पासून गोंदिया शहर,आमगाव,अर्जुनी मोरगाव व रावणवाडी याठिकाणी राबविली जात आहे.या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे संपुर्ण राज्यात कौतुक होत आहे.