यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
नाशिक येथील युवतीने यावल शहरातील वाणी गल्लीत राहात असलेल्या युवकाशी लग्न करून चौथ्या दिवशीच लग्न लावण्यासाठी तिच्या कुटुंबियांने घेतलेले दोन लाख रुपये रोख तसेच घरातील कपाटात असलेले ५० हजार रुपये रोख व १५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज घेऊन सदरील नवविवाहिता पसार झालेली आहे.याप्रकरणी नववधूसह पाच जणांवर युवकाचे फिर्यादीवरून येथील पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,येथील वाणी गल्लीतील रहिवासी चित्तरंजन जयप्रकाश गर्गे या युवकाचे बऱ्हाणपूर येथील नातेवाईक अशोक सुधाकर जरीवाले यांनी शिर्डी येथील शीला साईनाथ अनर्थे(पाटील) या महिलेस चित्तरंजन गर्गे यांचेसाठी मुलगी पाहण्यासाठी सांगितले होते.त्यानुसार शीला अनर्थे यांनी नाशिक येथील माया संजय जोशी या मुलीच्या नाशिक येथील तिचे घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला.मुलगी पसंत असल्याचे गर्गे यांनी कळविल्यावर १५ जानेवारी २३ रोजी मुलीसह तिचे कुटुंबीय व शिला अनर्थे हे यावल येथे चित्तरंजन गर्गे यांचे घरी आले असता मुलीकडील मंडळींना मुलाचे घर आवडल्यानंतर त्यांनी मुलीचे लग्न लावून देण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली.त्यापैकी त्याच दिवशी ५० हजार रुपये आगाऊ रक्कम देऊन उर्वरित राहिलेली रक्कम लग्नाचे दिवशी देण्याचे ठरले.त्यानंतर नाशिक येथून बऱ्हाणपूर येथे विवाह लावण्यासाठी गर्गे यांनी पे फोन द्वारे वाहनभाडे बारा हजार रुपये पाठवले.३० जानेवारी २३ रोजी बऱ्हाणपूर येथील गायत्री संस्कार ट्रस्ट येथे हिंदू रिती-रिवाजाप्रमाणे विवाह लावण्यात आला.लग्न लावून ३० जानेवारी २३ रोजी रात्री नववधूस यावल येथे आणण्यात आले.२ फेब्रुवारी २३ रोजी येथील फालक नगरातील ब्युटी पार्लर मध्ये नववधूस पती चित्तरंजन गर्गे यांनी सोडले.पार्लरमध्ये वेळ लागणार असल्याने गर्गे घरी निघून गेले.पुन्हा एक तासाने नववधूस घेण्यासाठी आले असता नववधूने पार्लर मधून पलायन केलेले होते.शहरात सदरील नवविवाहितेचा सर्वत्र शोध घेतला असता नववधू कुठेही आढळून आली नाही.त्यानंतर गर्गे यांनी तातडीने घरी जात घरचे कपाटातील वस्तूंचा शोध घेतला असता ५० हजार रुपयाची रोकड व १५ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास झाले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.सदरील घटनेबाबत चित्तरंजन गर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अशोक सुधाकर जरीवाले बऱ्हाणपूर, शीला साईनाथ अनर्थे शिर्डी,नववधू माया संजय जोशी नाशिक,नववधूचा भाऊ प्रकाश संजय जोशी नाशिक व प्रकाश जोशी यांची पत्नी अशा पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहेत.