यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे बक्षीस व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला.महाविद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती विद्यामंदिर यावल येथील उपक्रमशील शिक्षक डॉ.एन.डी.महाले होते.सदरील पारितोषीक वितरण सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जाचा चढता आलेख याबाबत माहिती दिली.तर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांनी विविध स्पर्धेत मिळविलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले. तसेच ज्यांना यश मिळाले नाही त्यांनी खचून न जाता यश संपादन करण्यासाठी संकल्प करावा त्याचबरोबर अभ्यास व वाचनात सातत्य ठेवल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला जीवनाची स्वतंत्र वाट निर्माण करता येईल त्यांनी आपल्या मार्गदर्शनातुन प्रतिपादन केले.प्रमुख अतिथी डॉ.एन. डी.महाले यांनी नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या यशस्वी जीवनातील सुरुवातीपासून-आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल त्यांच्या जीवनाच्या एका कथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महत्व पटवून दिले.विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नाला सामोरे जायची तयारी ठेवली पाहिजे तसेच आपण जसा विचार करु तशाच भावना आपल्या तयार होतात व त्याचप्रमाणे वर्तन घडत असते त्याकरिता आपल्या विचारांना बळकटी असायला हवी.मनुष्य हा आजन्म विद्यार्थी असायला हवा.आपल्या प्रत्येकाच्या यशामागे आपले आई-वडील व त्यांच्यानंतर गुरूजणांचा मोठा हातखंडा असतो असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले.उपप्राचार्य प्रा.संजय पाटील मार्गदर्शन करतांना स्वप्न मोठी पहा व वेळेचे नियोजन करा व इतरांपेक्षा वेगळे करायला शिका असा मोलाचा सल्ला दिला.
प्रसंगी टी वाय.बी.एससी ची विद्यार्थिनी फरीदा तडवी हिने कोविड- १९ बाबत घ्यावयाची काळजी तसेच कोविडचे दुष्परिणाम यावर मनोगत व्यक्त केले.कु.प्रीती निळे हिने ‘बाप’ या विषयावर कविता सादर केली.कु.खुशी लहाने (बारावी कला) हिने कोरोनाचे शिक्षणावर परिणाम यावर मनोगत व्यक्त केले तर सुचिता बडगुजर हिने देशभक्तीपर गीत सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मनोज पाटील तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ए पी.पाटील यांनी मानले.सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.