बाळासाहेब आढाळे,मुख्य संपादक
पोलीस नायक न्यूज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कारकिर्द घडविण्यात रमाईचा सिंहाचा वाटा आहे. त्यांची आज (दि.७ फ्रेब्रुवारी २३)१२५ वी जयंती यानिमित्त…
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडविण्यात रमाईचा सिंहाचा वाटा आहे.रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली.रमाईने आपले जीवन बाबासाहेबांच्या कार्यांप्रती समर्पित केले नसते तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते हे नाकारता येत नाही.मुंबईतील भायखळा मार्केटमधील मासळी बाजार येथे बुधवार ४ एप्रिल १९०६ रोजी रमाईचे भिवासोबत लग्न झाले.रमाईच्या जीवनाच्या अनेक हृदयदायक घटना सांगता येतील.एका प्रसंगी बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात रमाईला नेसायला लुगडे नव्हते.तेव्हा रमाईने बाबासाहेबांचा फेटा लुगडे म्हणून घातला.गरिबीची केवढी मोठी शोकांतिका!पण रमाईच्या त्यागामुळे आज देशातील लाखो महिलांचे जीवनच बदलून गेले आहे.रमाबाई संसारात रमल्या परंतु भीमराव पुस्तकांत.बाबासाहेब तहानभूक विसरून पुस्तक वाचनात दंग असत.एकदा जेवणाची वेळ झाली असता रमाबाईंनी त्यांच्यापुढे जेवणाचे ताट ठेवले.साहेबांचे जेवण आटोपले असेल म्हणून ताट उचलण्यासाठी त्या खोलीत जरा वेळानेच गेल्या तर ताट तसेच उघडे.न राहून रमाबाईंनी त्यातल्या एका पुस्तकाचे पान उघडले आणि म्हणाल्या या पुस्तकात नवऱ्याने आपल्या बायकोशी कसे वागावे,कुटुंबाशी कसे वागावे हे लिहिले असेल तेवढेच मला वाचून दाखवा.बाबासाहेब म्हणतात,’अगं वेडे,नवऱ्यानं संसार कसा करायचा हे काही पुस्तकात लिहिलेल नसतं.’बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई संघर्षरत राहिल्या हे सर्वश्रुत आहे. त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनात अत्यंत हालअपेष्टा,दु:ख,गरिबी यावर मात केली.बाबासाहेबांपर्यंत दु:खाची झळ पोहचू दिली नाही.आपल्या संसारात आदर्श पत्नी,सून,माता या भूमिका त्यांनी अपार कष्टाने पार पाडल्यात.कधी तक्रार नाही की कुठे त्याची वाच्यता नाही.अथांग दु:खाचे कधी भांडवल केले नाही.घरातील आर्थिक संकटाचा कोणासही थांगपत्ता लागू दिला नाही.एका मातेसाठी तिचा मुलगा मरण पावणे यासारखे जगात दुसरे दु:ख नाही.रमाईची तर एकापाठोपाठ तीन मुलगे आणि एक मुलगी औषधपाण्याविना तडफडून मरण पावले.म्हणूनच रमाईच्या त्यागाची थोरवी गाताना कवी यशवंत मनोहर म्हणतात,’रमाई मातृत्वाचे महाकाव्यच होय,जीवनाचा तो एक संपूर्ण दु:खाशय होता.’