यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील हिंगोणा येथील युवकाने ग्रामपंचायतीच्या विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.याप्रकरणी फैजपूर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवाशी राजाराम रमेश भिल्ल वय ३५ वर्ष हा युवक मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.सदरील युवकाने हिंगोणा गावाच्या न्हावी मारूळ रस्त्यावरील बेघर वस्ती जवळ असलेल्या ग्रामपंचायत मालकीच्या विहीरीत काल दि.६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्यासुमारास विहीरीत उडी घेवुन आपली जिवन यात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे.हिंगोणा ग्रामपंचायतच्या मालकीच्या गावात पाणीपुरवठा करणाऱ्या तिन विहीरी असुन यासर्व विहिरीवर ग्रामस्थांच्या सुरक्षेकरिता लोखंडी जाळी बसविण्यात आलेली नसल्याने या विहीरीत अनेक ग्रामस्थांनी आत्महत्या केलेल्या आहेत.या गंभीर विषयाकडे ग्रामपंचायतचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने अनेक वेळा मागणी करण्यात आली असून देखील ग्रामपंचायतीच्या वतीने दुर्लक्षच करण्यात आलेले आहे.किमान आता तरी या विहीरींवर लोखंडी जाळया बसविल्यास भविष्यात अशा प्रकारच्या आत्महत्यांचे प्रकार होणार नाही अशी अपेक्षा ग्रामस्थांकडुन व्यक्त केली जात आहे.सदरील घटनेची खबर पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांनी दिल्यावरून फैजपुर पोलीस ठाण्यात अकसमात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.मयत तरूणाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.सदरील तरुणाने आत्महत्या का केली?याचे कारण मात्र अद्यापी स्पष्ट झालेले नाही.