यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवाशी मुबारक रमजान तडवी हा मजुर विहीरीतील गाळ काढण्यासाठी गेला असतांना अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने त्या मातीच्या ढगाऱ्याखाली दबुन गुदमरून सदरील मजुराचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.याबाबत फैजपुर पोलीस ठाण्यात घटनेबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील हिंगोणा येथील कामगार मजूर मुबारक रमजान तडवी वय-३२ वर्षे हा दि.१७ फेब्रुवारी शुक्रवार रोजी हिंगोणा येथील शेतकरी हुना जयराम चोपडे यांच्या हिंगोणा शिवारातील गट क्रमांक ९१७ मध्ये असलेल्या शेतातील विहीरीवर गाळ काढण्याच्या कामासाठी गेला होता.रात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास विहीरीवर काम करीत असतांना मुबारक तडवी यांच्या अंगावर माती पडून मातीच्या ढिगाऱ्याखाली दबुन गुदमरून दुदैवी मृत्यु झाला.याबाबत शेतमालक हुना जयराम चोपडे यांनी दिलेल्या खबरीवरून फैजपुर पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास फैजपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.मयत मुबारक तडवी यांच्या मृतदेहावर यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन केले.तर मरण पावलेला कामगार मजूर मुबारक तडवी यांच्या कुटुंबात पत्नी,तिन मुल अस परिवार आहे.मुबारक तडवी हा त्याच्या घरात कमावता व्यक्ती होता व त्याच्या मजुरीवरच त्याचा परिवार हा चालत होता परंतु त्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या परिवारापुढे मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत.तरी शासनाच्या वतीने त्यांच्या परिवाराला भरीव अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मुबारक तडवी यांच्या परिवाराकडून तसेच गावकऱ्यांच्या वतीने केली जात आहे.