यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील अंजाळे घाटाजवळ झालेल्या रस्तालुट प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन जणांना पकडण्यात यश मिळविले असून परिणामी या प्रकरणात आता आरोपींची संख्या चार झाली आहे.यातील एक आरोपी हा अल्पवयीन असून त्याची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.तर दुसरा आरोपी प्रेम उर्फ सुरज पुना राठोड यास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,यावल-भुसावळ रस्त्यावर सोमवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास भुसावळकडून येत असलेल्या यावल येथील अजय रमाकांत मोरे (वय २७) या युवकाची दुचाकी अंजाळे घाटाजवळ चार अज्ञात चोरट्यांनी रोखत त्यास पिस्तूलाचा धाक दाखवून व त्याला मारहाण करत त्याचे कडील दुचाकीसह हातातील मोबाईल हिसकावून पसार झाले होते.याप्रकरणी पोलीसांनी वेगाने तपास करीत या गुन्ह्यातील सर्व चार संशयीतां पैकी करण रमेश पवार(वय २२ वर्षे) व विक्की अंकुश साळवे(वय २० वर्षे) दोन्ही रा.आसोदा या दोन संशयितांना सोमवारीच मध्यरात्री नंतर पोलीसांनी अटक केले होते.यानंतर मंगळवारी रात्री असोदा ता.जळगाव येथील प्रेम उर्फ सुरज पुना राठोड वय २१ वर्षे यास अटक केली असून त्याचेकडून गावठीकट्टा जप्त करण्यात आला आहे.प्रेम राठोड यास बुधवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्या.एस एम बनचरे यांनी १४ दिवसाची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.दरम्यान याच प्रकरणात अन्य चौथा संशयित आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्यास बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश
मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे,सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठान,पोलीस नाईक भुषण चव्हाण हे करीत आहेत.