यावल-पोलिस नायक(प्रतिनिधी):-
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जामुनझीरा या अतिदुर्गम आदीवासी गावात होळीचे औचित्य साधुन आदीवासी बांधवांच्या उपस्थितीत शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या भोगऱ्या बाजाराला आज दि.२ फेब्रुवारी पासून सुरूवात झाली आहे.या पारंपरिक होळीच्या सणाला पावरा आदीवासी बांधव हे “भोंगऱ्या बाजार” म्हणतात.
या सणाकडे लक्ष वेधणाऱ्या सातपुडा पर्वताच्या सान्निध्यात असलेल्या पंचक्रोशितील वाड्या व पाड्यांवर राहात असलेल्या आदीवासी समाजाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहाने तयारी केली जाते.या “भोंगऱ्या बाजार”सणानिमित्ताने महिलांपासून तर लहान मुला-मुलींमध्ये त्यांचे पारंपारीक आकर्षक पोषाख घालण्याची एक वेगळीच प्रथा आहे.आख्यायिकेनुसार समाजातील तरुणीने आपले प्रेम हे खरे आहे हे सिद्ध करण्यासाठी अग्निच्या पेटलेल्या ज्वालांमध्ये उडी घेतली होती परंतु निष्पाप व प्रांजळपणे केलेल्या प्रेमामुळे ती तरुणी अग्निज्वालांमधुन जिवंत बाहेर आली व तिची अग्निपरिक्षा झाल्यावर तिचा विवाह बांबुकाम करणाऱ्या भोंगडा नामक तरूणाशी आंतरजातीय विवाह झाल्याचे सांगण्यात येते.तेव्हापासुन या भोंगडा नांवावरूनच अपभ्रंशाने” भोंगऱ्या बाजार” या उत्सवाचे नाव पडल्याचे आदिवासी बांधव सांगतात.त्यामुळे होळीने केलेल्या या सत्वपरीक्षेची स्मृती म्हणुन हा भोंगऱ्या सण आदिवासी बांधव साजरा करतात.या भोंगऱ्या बाजारासाठी खान्देशातील सातपुडा पर्वतात विखुरलेल्या महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेशात राहणारे आदीवासी समाज बांधव एकत्र येतात.
अशा या पारंपरिक अशा “भोंगऱ्या बाजारा”चे यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जामुनझीरा या सुमारे ५oo लोकवस्तीच्या गावात प्रथम आयोजन करण्यात आले.या भोंगऱ्या बाजारास परिसरातील व महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेशात राहणारे आदीवासी समाज बांधव यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला.यानिमित्त आदीवासी तरूण तरुणी यांनी आपले पारंपारिक पोषाख परिधान करून ढोलच्या तालावर पावरी गाण्यांवर गोल आकार करून आकर्षक नृत्य सादर केले.जामुनझिरा तालुका यावल येथे सदरील भोंगऱ्या बाजार हा आजपासून चार ते पाच दिवस चालणार आहे.आज रोजी इंद्रदेवाची पुजा करून होळी व धुलीवंदन खेळुन या उत्सव सणाची आदीवासी बांधवांकडून सांगता करण्यात आली.