यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील कांदा उत्पादनावर शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान जाहीर केले असुन मात्र प्रत्यक्षात शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तरी महाराष्ट्र शासनाने कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने एका निवेदनाव्दारे करण्यात आली असुन सदरील मागणी मान्य न झाल्यास संघटनेच्या माध्यमातुन राज्यात तिव्र आंदोलन छेडले जाईल असा ईशारा देण्यात आला आहे.या संदर्भात येथील निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांना मागणीचे निवेदन नुकतेच देण्यात आले.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी संपुर्ण राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दि.१ फेब्रुवारी २३ पासुन ते ३१ मार्च पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कांदयाची विक्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केली असेल अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून ३५० रूपये प्रमाणे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आला आहे.सदर अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्याच्या सातबाराच्या उताऱ्यावर ई पिक पेरणी व्दारे कांदयाची नोंद असणे व त्या सातबाराच्या उताऱ्या जोडणे बंधनकारक केलेले आहे.यावल तालुक्यात आज घडीला जवळपास ८० ते ९० टक्के शेतकऱ्यांकडे कांदा पेरणी केलेल्या ई पिक पाहणीच्या नोंदी नसल्याने प्रत्यक्षात कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीकरून देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या जाचक अटीमुळे सानुग्रह अनुदानापासुन वंचीत राहावे लागत आहे.यावल तालुक्यात अनेक शेतकऱ्यांकडे आज देखील अन्ड्राइड मोबाइल व त्यासाठी लागणारी इंटरनेट सेवा उपल्बध नसल्या कारणाने ई पिक पाहणीची नोंद होवु शकलेली नाही तसेच काही शेतकरी बांधवांनी ई पिक पाहणी नोंद केलेली असतांना देखील ती नोंद उताऱ्यावर दिसुन येत नाही या गोंधळलेल्या परिस्थित अनेक शेतकरी बांधवांना या अनुदानापासुन वंचीत राहावे लागत आहे.तरी शासनाने लावलेली ई पिक पाहणी सातबाराची नोंद ही अट रद्द करावी तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून ३५० रूपये प्रमाणे मिळणाऱ्या सानुग्रह अनुदान देण्यात यावा अशी मागणी करण्यात या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने यावलचे निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांना देण्यात आलेल्या निवेदनावर मनोज साहेबराव पाटील,बाजीराव जिजाबराव पाटील,स्वनिल छबिलदास पाटील,देवीदास मधुकर पाटील,महेश बाबुराव पाटील,निलेश शिवाजी पाटील,चेतन रविंद्र जावळे,घन :शाम वासुदेव पवार,महेश प्रल्हाद चौधरी,रामकृष्ण कौतीक पाटील,विजय आंनदा पवार,महेश नंदकिशोर पाटील यांच्यासह अनेक संघटनेचे शेतकरी पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत.