यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
स्वयंदीप प्रतिष्ठान व नोबेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहावी व बारावी नंतर काय ? करिअरच्या विविध संधी या विषयांवर विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विशेष कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक सुनिल गरूड,खेमचंद पाटील,सतिश मोरे व नितिन सोनवणे हे होते.यावेळी जळगाव शहरातील व जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक मान्यवरांनी तसेच पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थी पालकांनी व विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.या कार्यशाळेचे दोन सत्रात विभाजन करण्यात आले होते.प्रथम सत्रात नोबेल फाउंडेशनचे जयदीप पाटील यांनी पालकत्व व करिअर याबाबतीत मार्गदर्शन केले.तर दुसऱ्या सत्रात डांभुर्णी तालुका यावल येथील व स्वयंदीप प्रतिष्ठानचे संदीप पाटील (सोनवणे) यांनी करिअरच्या विविध संधी तसेच शालेय स्तरीय स्पर्धा परीक्षा,संरक्षण दलातील विविध संधी,विविध प्रवेश परीक्षा व महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था तसेच नवनवीन क्षेत्र याबाबतीत विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधला.दोन्ही सत्रांच्या शेवटी पालकांच्या मनातील करियर तसेच शैक्षणिक संस्था,भविष्यातल्या विविध संधी यांच्या बाबतीतल्या शंका यांचे निरसन करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन स्वयंदीप प्रतिष्ठानचे संचालक शैलेश शिरसाठ यांनी केले तर आभार नोबेल फाउंडेशनचे देवलसिंग पाटील यांनी मानले.