महाराष्ट्र भुषण सोहळ्यानंतर उष्माघातामुळे ११ जणांच्या मृत्यूप्रकरणी अमोल मिटकरींची शिंदे सरकारवर टीका
ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दि.१६ एप्रिल रविवार रोजी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. राज्यभरातून या पुरस्कार सोहळ्याकरिता आप्पासाहेबांचे अनुयायी आले होते मात्र या कार्यक्रमानंतर उष्माघाताने तब्बल ११ जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे परिणामी या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटतांना दिसत आहेत यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या घटनेवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून ११ जणांच्या मृत्यूला राज्य सरकार जबाबदार धरून म्हटले आहे की,आजवर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची सुद्धा एक पद्धत होती मात्र या सरकारने अध्यात्माचे राजकारण करत नाहक लोकांचा बळी घेतला आहे त्यामुळे त्यांच्या मृत्यूला शिंदे सरकार जबाबदार असल्याने शिंदे सरकारविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी केली आहे.त्याचबरोबर ११ जणांच्या मृत्यू प्रकरणी शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आता सद्गुरू परिवारानेही केली पाहिजे असे ते म्हणाले.दरम्यान या घटनेवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. अजित पवार यांनी काल रात्री उशीरा रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली यावेळी बोलताना ते म्हणाले की,महाराष्ट्रभूषण पुरस्कार फार महत्त्वाचा आहे पण हलगर्जीपणा झाल्यामुळे काय घडू शकत हे आजच्या घटनेतून पाहायला मिळाले व त्यामुळेच महत्त्वाच्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे.या घटनेमध्ये अजून नेमके किती लोक मृत्यूमुखी पडले आहेत हा आकडा समोर आलेला नसून खरेतर कार्यक्रमाची वेळ उन्हाळ्यात भर दुपारची निवडणे हेच आयोजकांचे चुकलेले असल्यामुळे त्यातील काही निष्पाप लोकांचा बळी गेला असल्याची खंत राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.