सादिक शेख,पोलीस नायक
मोताळा तालुका (प्रतिनिधी):-
तालुक्यातील धामणगाव बढे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच संध्याकाळी युवा भिम शक्ती यांच्या वतीने गावातून व मुख्य चौकातून डॉ.आंबेडकर यांची शोभायात्रा काढण्यात आली.प्रसंगी ढोल ताशाच्या गजरात भीमसैनिक मंत्रमुग्ध होऊन ठेक्यावर थिरकले.गावात शोभायात्रा दरम्यान सर्व शांततामय वातावरणात जसे की निळे वादळ दिसायला लागले होते हे विशेष !या शोभायात्रेत अनेक पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी व सर्व धर्मीयांचे नागरिक तसेच भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली.सदर मिरवणुकीत जातीय सलोख्याचा आभास पाहायला मिळाला.मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच शांतता अबाधित राहावी याकरिता पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली धामणगाव बढे पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.