जालना-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
महाराष्ट्र राज्यातील सत्तेची सूत्रे कधीही भाजपच्या ताब्यात मिळालेली नाहीत व यापुढेही तशी मिळण्याची शक्यता नाही असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केले आहे.भाजप व शिवसेना यापैकी कुणालाही राज्यात शतप्रतिशत सत्ता मिळालेली नाही तसेच शरद पवार यांच्या आमदारांची संख्याही आतापर्यंत ६०-७० च्या पुढे कधीही गेलेली नाही.जालना जिल्ह्यात पहिल्यांदा शिवसेनेची शाखा स्थापन झाली त्या काळात म्हणजे १९९० पूर्वी कीर्तिकर यांच्याकडे शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली होती त्यानंतर अनेक वर्षांनंतर जालना दौऱ्यावर आलेल्या कीर्तिकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत काही कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.या दौऱ्यादरम्यान गजानन कीर्तिकर यांनी हे भाकीत व्यक्त केले आहे.
यावेळी गजानन कीर्तिकर म्हणाले कि,आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे जागावाटप २०१९ प्रमाणे असेल.२०१९ मध्ये युतीतील जागावाटपात भाजपला १६२ जागा व शिवसेनेला १२६ जागा सोडण्यात आल्या होत्या. २०१९ मध्येही असेच जागावाटप करण्यात आले होते.२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी युतीत भाजपच्या वाटय़ाला २६ आणि शिवसेनेकडे २२ जागा होत्या.राज्यात भाजप कमकुवत आहे असे आम्ही म्हणणार नाही परंतु ते शिवसेनेपेक्षा मजबूत आहेत असेही आम्ही मान्य करणार नाही.भाजप प्रवेशासाठी शरद पवार यांच्या कुटुंबीयांवर दबाव असल्याच्या शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याच्या संदर्भात कीर्तिकर म्हणाले,तसे नाही हो,राऊत यांच्या दाव्यावरून भारावून जाऊ नका.दूरचित्रवाणीच्या माध्यमातून संजय राऊत हे एक मनोरंजनाचे साधन बनलेले आहे.राऊत बोलतात व ते ऐकून तुम्ही मला प्रश्न विचारतात.शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर विरोधकांकडून होणारे आरोप आता जनता विसरली आहे.एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीमुळे ते लोकनेतृत्वाच्या उच्च स्थानावर पोहोचलेले असून तेवढय़ाच उंचीवर पक्षसंघटना नेण्याचे काम ते करीत आहे असे कीर्तिकर यांनी म्हटले आहे.