यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
तालुक्यातील डांभुर्णी येथील आझाद नगरातील रहिवाशी श्रावण लक्ष्मण कोळी वय ५५ वर्षे यांनी सततचे ओढवणारे नैसर्गीक संकट व त्यामुळे होणारी नापिकीला कंटाळुन विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील डांभुर्णी येथे काल दि.१८ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास गावातील शेतकरी श्रावण लक्ष्मण कोळी वय-५५ वर्षे हे नियमितपणे आपल्या गुरा ढोराला चारापाणी करून घरी आले असता अचानक त्यांना चक्कर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ श्रावण कोळी यांना खाटीवर झोपविले असता त्यांनी काहीतरी विषारी औषध सेवन केले असल्याचे लक्षात येताच लागलीच उपस्थित ग्रामस्थांनी सदरील माहिती त्यांचा मोठा मुलगा योगेश यास फोनवर देऊन घरी बोलवले व श्रावण कोळी यांना तातडीने जळगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.मात्र आज दि.१९ एप्रील रोजी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले आहे.श्रावण कोळी यांनी अशा प्रकारे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या कुंटूबावर आभाळच कोसळले आहे.लक्ष्मण कोळी हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी आपल्या शेतीसह इतर शेती बटाईने करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत संसाराचे गाडे हाकत होते मात्र मागील दोन तीन वर्षापासून मेहनत करूनही त्यांना मनासारखे उत्पन्न मिळत नव्हते तसेच वारंवार नैसर्गिक आपत्तीने होणारे नुकसान यामुळे त्यांनी घेतलेल्या कर्जाचे ओझे डोईजड झाल्याने ते बऱ्याच दिवसापासून कर्जबाजारीमुळे हताश झाले होते.पुढील वर्षासाठी शेती तयार करावी म्हणून पैसा उपलब्ध नसल्याने बँक व सोसायटीचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून त्यांनी सदरील टोकाची भूमिका घेतली असावी असे जनतेतून बोलले जात आहे.दि.१८ एप्रील रोजी घरी कोणी नसतांना त्यांनी टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध घेत आपली जीवन यात्रा संपवली असून त्यांच्या पच्यात पत्नी,दोन मूल,दोन बहिणी,जावई,नातवंड असा परिवार असून श्रावण कोळी हे डांभुर्णी येथील रिक्षा चालक योगेश कोळी यांचे वडील होते.