मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
राज्यातील शाळकरी मुलांसाठी आनंदाची बातमी असून त्यानुसार आजपासून म्हणजेच २१ एप्रिल २०२३ पासून शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे याबाबत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच माहिती दिली आहे.गेल्या काही दिवसांपासुन उन्हाचा पारा चांगलाच वाढला असल्याने या पार्श्वभूमीमुळे यंदा मे महिन्यातील सुट्ट्या आता एप्रिल मध्येच देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ज्या शाळांचे अभ्यासक्रम पूर्ण झाले आहेत अशा शाळांना आजपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देतांना दीपक केसरकर यांनी म्हटले आहे की,महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता गृहीत धरून २१ एप्रिलपासून मुलांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.यात ज्या शाळांचा अभ्यासक्रम अद्याप सुरू आहे त्या वगळता बोर्डाच्या सर्व शाळांना सुट्टी असेल तसेच शाळा कधी सुरु होतील याचीही माहिती त्यांनी दिली आहे.त्यानुसार विदर्भातील शाळा ३० जूनला सुरू होतील तर उर्वरित महाराष्ट्रातील शाळा या १५ जूनपासून सुरु होतील असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.राज्यातील वाढत्या तापमानामुळे पालकांना चिंता लागली होती त्यामुळे सीबीएसई व इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरवण्याबाबत शाळा प्रशासन व शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी करण्यात येत होती यानंतर राज्य सरकारने मोठी घोषणा करत अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांना आजपासून सुट्टी जाहीर केली आहे तसेच सुट्टीच्या काळात शाळांमार्फत राबवण्यात येणारे अतिरिक्त वर्ग सकाळच्या किंवा संध्याकाळच्या सत्रात राबवण्यात यावे त्यामुळे दुपारच्या सत्रात ते घेऊ नये असेही यात नमूद करण्यात आले आहे.त्याचबरोबर इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी सोडून इतर कोणत्याही वर्गाच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलवू नये अशा सूचनाही केसरकर यांनी दिल्या आहेत.