अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लढ्याला त्र्यंबकेश्वरमध्ये यश आले असून या ठिकाणी वेगळी पंगत बसवण्याची प्रथा अंनिसच्या आक्षेपानंतर बंद करण्यात आली आहे.मागील शेकडो वर्षांपासून ग्रामदेवता महादेवीच्या नावाने गाव जेवणाची परंपरा सुरू होती यात विशिष्ट जातीतील व्यक्तींना वेगळा स्वयंपाक करण्याची तसेच जेवणासाठी वेगळी पंगत बसण्याचीही परंपरा होती.त्र्यंबकेश्वरमध्ये महादेवी ट्रस्टकडून या गावजेवणाचे आयोजन केले जाते त्यामध्ये साधारण १० हजार लोक जेवण करीत असतात मात्र गावातील एका विशिष्ट समाजाच्या भोजनासाठी लागणारे अन्न वेगळे शिजवले जाते तसेच या विशिष्ट समाजाची भोजनाची पंगत इतर समाजबांधवापासून वेगळी बसविण्यात येते असा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील कार्यकर्त्यांनी आरोप केला होता विशेष म्हणजे लोकवर्गणीतून जमा झालेल्या रकमेतूनच हे गावजेवण होते.हे गावजेवण रविवारी २३ एप्रिल रोजी होणार होते मात्र अंनिसने विशिष्ट समाजासाठी वेगळा स्वयंपाक करणे व त्यांच्या वेगळ्या पंगती बसवण्याला विरोध केला त्याबाबत प्रशासनालाही निवेदन देत हस्तक्षेपाची व कारवाईची मागणी केली.
अंनिसने अशा आशयाचे निवेदन त्र्यंबकेश्वरचे तहसिलदार व पोलीस निरीक्षकांना दिले त्यांच्याशी या पंगतभेदाबाबत सविस्तर चर्चा केली. गावजेवणात एका विशिष्ट समाजासाठी वेगळ्या ठिकाणी अन्न शिजवणे व त्यांची वेगळी पंगत बसविणे ही राज्यघटनेशी विसंगत अनिष्ट व अमानवीय प्रथा आहे तसेच सामाजिक विषमतेला बळ देणारी गोष्ट आहे असे सांगितले.यानंतर तहसिलदारांनी संबंधित ट्रस्टींना बोलावून समज दिली तसेच पोलीस प्रमुखांनीही कायद्याचे पालन करून एकोप्याने राहण्याच्या आणि सर्वांनी एकाच पंगतीत भोजनाचा आनंद घेण्याच्या अंनिसच्या मागणीला पाठबळ दिले.विशेष म्हणजे ट्रस्टींनीही योग्य तो निर्णय घेऊन सर्वांना एकाच पंगतीत भोजन घेण्यासाठी आवाहन केले. त्यामुळे वर्षानुवर्षे चालत आलेली विशिष्ट समाजाची वेगळी पंगत बसण्याची प्रथा संपुष्टात आली असून यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन तहसिलदार,पोलीस प्रशासन आणि महादेवी ट्रस्टने धाडस दाखवले यातून हे यश आल्याची भूमिका अंनिसने मांडली असून त्यांनी घेतलेल्या या पुढाकाराने महाराष्ट्रभरातील सर्व समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या कार्याचे संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.तसेच ज्याठिकाणी कोणत्याही कारणास्तव माणसामाणसात भेदभाव केला जात असेल तो सूज्ञांनी पुढे होऊन थांबविला पाहिजे असे आवाहन यावेळी अंनिसच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रसंगी त्र्यंबकेश्वर अंनिस कार्याध्यक्ष संजय हराळे यांनी म्हटले आहे की,गावजेवण पंगतभेद होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले होते. तशा प्रकारच्या तक्रारी स्थानिक भाविकांकडून प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे जिल्हा शाखेला सोबत घेऊन प्रशासन व ट्रस्टींशी सुसंवाद केला व त्यातून हे परिवर्तन झाले आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती याचे स्वागत करत असल्याचे त्यांनी नमूद केले.या स्तुत्य उपक्रमात अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराणे,राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे,डॉ.सुदेश घोडेराव,अॅड.समीर शिंदे,संजय हरळे यांचा सहभाग नोंदविला.