Just another WordPress site

पवारांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता ; पुढील उत्तराधिकारी कोण ?

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथील पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याची घोषणा होती त्यानंतर राष्ट्रवादीच्या तमाम नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घालत निर्णय मागे घेण्यासाठी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.गेल्या आठवडय़ात भाकरी फिरवण्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत स्वत:पासून अंमलबजावणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा शरद पवार यांनी मंगळवारी केली.सदरील धक्कादायक निर्णयाने अस्वस्थ झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,कार्यकर्त्यांनी ‘राजीनामा देऊ नका’,अशी आग्रही मागणी केल्याने यशवंतराव चव्हाण केंद्रात नाटय़ रंगले मात्र पवार हे राजीनाम्यावर ठाम असल्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण ? याबाबत अनेक शक्यता वर्तविण्यात येत आहेत.‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यातील कार्यक्रमात बोलतांना शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर करताना त्यांनी शिक्षण,सामाजिक कार्य,शेती,सहकार,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात काम सुरूच ठेवण्याचा मानस व्यक्त केला.पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर उपस्थित नेते आणि कार्यकर्ते अवाक झाले. राजीनामा देऊ नका अशी साद यावेळी त्यांनी पवारांना घातली.यावेळी जयंत पाटील,जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.

शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी जयंत पाटील,प्रफुल्ल पटेल,छगन भुजबळ यांच्यासह सर्व नेते व्यासपीठावर त्यांच्याजवळ गेले. यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवृत्तीचा निर्णय मान्य नाही अशी घोषणाबाजी सुरू केली.सभागृहातील वातावरण धीरगंभीर बनले.प्रसंगी अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी संतप्त कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीच दाद देत नव्हते.शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याशिवाय हटणार नाही अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती.प्रफुल्ल पटेल,सुप्रिया सुळे,अजित पवार यांच्या आवाहनाकडेही कार्यकर्ते दुर्लक्ष करीत होते.सुमारे दीड तास शरद पवार व्यासपीठावर थांबून सारा प्रकार पाहत होते.पवार निघून गेल्यावरही कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते त्यानंतर नेतेमंडळी पवारांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली. अखेर सायंकाळी सहाच्या सुमारास अजित पवार,सुप्रिया सुळे आणि छगन भुजबळ यांनी पवारांचा निरोप कार्यकर्त्यांना दिला.दोन-तीन दिवसांत निर्णयाचा विचार करण्याचा शब्द पवारांनी दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले त्यानंतरच कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण केंद्रातून बाहेर पडले.

शरद पवार यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची समिती नेमण्यात आली असून त्यात प्रफुल्ल पटेल,सुनील तटकरे,के.के.शर्मा, पी,सी.चाको,अजित पवार,जयंत पाटील,सुप्रिया सुळे,छगन भुजबळ,दिलीप वळसे-पाटील,अनिल देशमुख,राजेश टोपे,जितेंद्र आव्हाड,हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे,जयदेव गायकवाड,फौजिया खान,धीरज शर्मा,सोनिया दूहन यांचा समावेश आहे ही समिती अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेणार आहे.पक्ष,संघटना वाढवणे व पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. तर अजित पवार,सुप्रिया सुळे हे पवारांचे कुटुंबातील वारसदार हे स्पर्धेत असतील.गेली पाच वर्षे प्रदेशाध्यक्षपद भूषविणारे जयंत पाटील, सुनील तटकरे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.प्रफुल्ल्ल पटेल हे पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात त्यांचे नावही चर्चेत आहे.  १ मे १९६० ते १ मे २०२३ असा ६३ वर्षे माझा राजकीय प्रवास सुरू आहे.इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.