बारसूमध्ये प्रकल्प झाला तर फायदा होईल असे मला गद्दारांनी सांगितले होते व आम्ही जेव्हा नाणारला विरोध केला आणि नाणारमध्ये हा प्रकल्प होणार नाही हे ठरले तेव्हा या गोष्टी घडल्या होत्या मात्र आता प्रकल्प आणा किंवा आणू नका या सरकारच्या खुर्चीचे पाय मला डगमगताना दिसत आहेत असे म्हणत बारसू प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. बारसू या ठिकाणी उद्धव ठाकरे आले होते तिथल्या कातळ शिल्पांची पाहणीही त्यांनी केली तसेच पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली.आज बारसूच्या प्रकल्पासाठी माझे पत्र नाचवत आहात मग वेदांता फॉक्सकॉन,बल्क ड्रग पार्क,एअरबस यांसारखे प्रकल्प गुजरातला का गेले? ते पण माझ्या कारकिर्दीतच येत होते ते तिकडे का जाऊ दिले?आज तुम्हाला सांगतो ही रिफायनरी गुजरातला न्या आणि तिथला वेदांता फॉक्सकॉन किंवा इतर प्रकल्प ज्यांच्यावरुन वाद नाहीत ते महाराष्ट्रात आणा.गिफ्ट सिटी गुजरातला का गेली?चांगल्या गोष्टी दिल्ली आणि गुजरातला न्यायचे आणि विनाशकारी प्रकल्प लादायचे याला काय म्हणायचे ? असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
मला या सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगताना दिसत आहेत.मी प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका घेतली असली तरीही सरकारकडून एक पाऊल मागे घेतले जात नसून त्यांच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत परीणामी हे सरकार पडेल असेही त्यांनी म्हटले आहे.जर माझी सगळ्या गोष्टींची नकारघंटा असती तर समृद्धी महामार्ग झाला असता का?असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.इतकेच नाही तर जेव्हा सगळे चांगले प्रकल्प गुजरातला जात होते तेव्हा हे शेपूट घालून का बसले होते?असाही संतप्त प्रश्न त्यांनी विचारला आहे.प्रकल्प चांगला असता तर आम्ही विरोध कशाला करु? मात्र ज्या प्रकारची दडपशाही चालली आहे त्यामुळे यात काहीतरी काळंबेर आहे असे दिसत आहे.मी पत्र दिले होते परंतु दडपशाही करुन प्रकल्प लादा म्हणून दिले नव्हते.हा परिसर निसर्गरम्य असून त्या परिसराचा,निसर्गाचा ऱ्हास करून हा प्रकल्प नको आहे.उपऱ्यांची सुपारी घेऊन भूमिपुत्रांच्या घरांवर वरंवटा फिरवणार का? असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.