महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल १५ मे पूर्वी लागण्याची शक्यता असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.अशातच शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सूचक विधान केले असून ११ ते १३ मे च्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्का लागला तरी आश्चर्य वाटू नये असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.त्या ‘टीव्ही ९ मराठी’ शी बोलत होत्या.एकनाथ शिंदे अचानक राज्यपालांना भेटायला जाणे,गुजरातमधील वर्तमानपत्रात बातमी येणे किंवा दिल्लीश्वरांनी तातडीने बोलावणे हे आतापर्यंत कधीही पाहिले नव्हते अशातच मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसांची रजा घेतली व या तीन दिवसांमध्ये सलग पूजा होती म्हणे ! पूजा वगैरे कशासाठी होत आहेत ? याचा अर्थ लावा परंतु ११ ते १३ मे दरम्यान बरचसे चित्र स्पष्ट झालेले असेल असे सुषमा अंधारेंनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी जिवाचा आटापिटा केला असून पुन्हा येण्यासाठी आताही करत आहेत परंतु दिल्लीश्वरांनी त्यांना तंबी दिली आहे कारण फडणवीसांच्या सर्व उठाठेवीमुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली असून विधानपरिषद निवडणूक व कृषी उत्पन्न बाजार समितीत तर ‘बाजार’च उठला आहे असा मिश्किल टोला सुषमा अंधारेंनी लगावला आहे.येणाऱ्या काळात शिंदेंचा हात धरणे कितपत आपल्याला हिताचे ठरेल याबद्दल भाजपालाच शंका आहे त्यामुळे ११ ते १३ मे च्या काळात निश्चितपणे देवेंद्र फडणवीसांना धक्का लागला तरीसुद्धा आश्चर्य वाटू नये असेही सुषमा अंधारेंनी म्हटले आहे.