“हिम्मत असेल तर निवडणुका लावा,तुम्ही मोदींच्या नावाने निवडणुका लढा मी माझ्या वडिलांच्या नावाने”-उद्धव ठाकरेंचे खुले आवाहन
कर्नाटकची निवडणूक जिंकण्यासाठी भाजप बजरंग बलीचे बळ लागत असेल तर पंतप्रधान मोदी यांची ५६ इंचाची छाती गेली कुठे? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.ते महाड येथे स्नेहल जगताप यांच्या पक्षप्रवेश सोहळय़ानिमित्ताने आयोजित जाहीर सभेत बोलत होते.बारसू प्रकल्पावरूनही त्यांनी भाजप आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.जेवढा पोलीस बंदोबस्त लावला तेवढा बंदोबस्त चीनच्या सीमेवर लावला असता तर चीनने घुसखोरी केली नसती अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.स्थानिकांचा विरोध असेल तर रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.देशाची वाटचाल अध्यक्षीय हुकूमशाहीच्या दिशेने सुरू झाली आहे.भाजप एक एक पक्ष संपवायला निघाला आहे पण पक्ष हा विचार आहे तो संपणार नाही.हिम्मत असेल तर निवडणुका लावा.तुम्ही मोदींच्या नावाने निवडणुका लढा मी माझ्या वडिलांच्या नावाने निवडणूक लढवतो.तुम्ही माझा चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणूक लढा मी धगधगती मशाल घेऊन निवडणुकीत उतरतो बघू कोण जिंकतो शिवसेना संपली असा समज झाला होता पण ज्या शिवसैनिकांनी शिवसेना मोठी केली ते सर्व जण माझ्या समवेत असल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले.
बारसू प्रकल्पावरून ठाकरे यांनी यावेळी आक्रमक भूमिका मांडली.स्थानिकांचा विरोध असेल तर बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही.वेळ पडली तर संपूर्ण महाराष्ट्रातील आमची संघटना बारसूत उतरेल,स्थानिकांवर लाठय़ा चालवता ही कुठली लोकशाही प्रकल्प हिताचा असेल तर जनतेत जाऊन सांगा,स्थानिकांना तडीपारी,जिल्हाबंदी कशाला करता असा सवालही त्यांनी केला.बारसूत मातीबरोबर माणसांच्या मनाचीही चाचणी करा,देश म्हणजे दगडधोंडे नाही.कोकणाच्या भरभराटीसाठी प्रकल्प असेल तर बंदोबस्त कशाला.कोकणच्या भूमिपुत्रांवर उपऱ्यांचा वरवंटा कशाला चालवता असा संतप्त सवाल त्यांनी केला.प्रकल्प व्हावा यासाठी मी पत्र दिले ते मी नाकारत नाही पण मला काही गद्दारांनी येऊन तिथे प्रकल्प होण्यास स्थानिकांचा विरोध नसल्याचे आणि जागा पडीक असल्याचे सांगितले होते म्हणून मी त्यावेळी पत्र दिल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्र एकीकरण समितीचा बंदोबस्त करायला निघाले आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांची भांडी घासायला निघाले आहेत त्यांना उत्तर देण्याची हिमंत मुख्यमंत्री दाखवणार का? असा प्रश्न ठाकरे यांनी विचारला.