“अहंकारी आणि स्वार्थी नेता देश चालवू शकत नाही”!अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दिल्लीतील सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देवूनही केंद्र सरकारने त्या विरोधात अहंकारातून अध्यादेश जारी केला आहे.अहंकारी आणि स्वार्थी नेता देश चालवू शकत नाही असा जोरदार हल्ला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चढविला आहे.दिल्ली सरकारवर नियंत्रण आणण्याच्या अध्यादेशाविरोधात विरोधकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी केजरीवाल मुंबईत आले असून त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली.यासंदर्भातील विधेयकाला संसदेत विरोध करण्यासाठी केजरीवाल यांच्या लढाईला ठाकरे यांनी साथ देण्याचे जाहीर केले आहे.
राज्य सरकारकडे असलेल्या प्रशासकीय विषय किंवा बाबींसाठी आवश्यक सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व बदल्या करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने ११ मे रोजी दिला होता.त्यानंतर आठच दिवसांत याविरोधात अध्यादेश जारी करून केंद्र सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व बदल्यांचे अधिकार आपल्याकडेच ठेवले आहेत.हे अधिकार मिळविण्यासाठी दिल्ली राज्य सरकारने आठ वर्षे न्यायालयीन लढाई करूनही केंद्र सरकार अहंकारातून न्यायालयीन निर्णयाविरोधात भूमिका घेत आहे हे लोकशाही तत्त्वांविरोधातही असल्याची टीका केजरीवाल यांनी केली आहे.या अध्यादेशासंदर्भातील विधेयक संसदेत मांडले जाईल तेव्हा भाजपचे राज्यसभेत बहुमत नसल्याने तेथे ते अडविले जावे यासाठी केजरीवाल यांनी प्रयत्न सुरू केले आहेत त्यादृष्टीने देशभरातील विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळविण्याचे केजरीवाल यांचे प्रयत्न असून त्यांनी ठाकरे यांची भेट घेऊन विरोधकांच्या भाजपविरोधातील ऐक्याबाबतही चर्चा केली यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही त्यांच्याबरोबर होते.त्यानंतर केजरीवाल,मान आणि ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.केजरीवाल हे आज गुरुवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.